कोपार्डे : करवीरच्या पश्चिमेला बालिंग्यापासून कुडित्रे फॅक्टरी ते आमशी, बोलोली, उपवडे व बारा वाड्यांची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगरूळ या बाजारपेठेच्या व मध्यभागी असणाऱ्या गावात पोलीस चौकी आहे. या चौकीत एक हवालदार व दोन पोलीस शिपाई यांची नियुक्ती असूनही या पोलीस चौकीला नेहमी कुलूप असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी ही पोलीस चौकी बिनकामाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगरूळ येथे असणाऱ्या पोलीस चौकीअंतर्गत २६ गावे व वाड्यावस्त्यांचे कार्यक्षेत्र आहे. करवीर पोलीस ठाण्यानंतर करवीरच्या पश्चिम भागातील जनतेसाठी सांगरूळ पोलीस चौकी अत्यंत जवळची आहे. मात्र, या पोलीस चौकीवर करवीर पोलीस ठाण्याचे नियंत्रणच नसल्याने येथे नियुक्त असणारे पोलीस कर्मचारीच चौकीत उपस्थित नसतात. यामुळे ही चौकी नेहमी बंद अवस्थेत असते. येथे पोलिसांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहे. मात्र, येथे कोणीही पोलीस कर्मचारी वास्तव्याला नसल्याने या निवासस्थानांची दयनीय अवस्था झाली आहे. पोलीस चौकीत पोलीस पंधरा दिवसांतून एकदाही हजर राहत नसल्याने एखादा गुन्हा किंवा तक्रार झाल्यास नागरिकांना कोल्हापूर येथील करवीर पोलीस ठाण्याला जावे लागते.खुद्द सांगरूळमध्ये दारूची आडवी झालेली बाटली मतदान घेऊन उभी करण्यात आली. सांगरूळमध्ये एक शासनमान्य दारू दुकान असूनही येथील चार तिकट्यांवर राजरोस अवैध दारू विक्री सुरू आहे. पासार्डे गावातही भरवस्तीत दारू विक्री चालू आहे. याला सांगरूळ पोलिसांची अनुपस्थितीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. बोलोली, तेरसवाडी, बारा वाड्या व धनगरवाड्यातील डोंगराळ भागात असणाऱ्या दुर्मीळ वनौषधी मोठ्या प्रमाणात असून, येथे पोलीस संरक्षण नसल्याने तस्करीला उधाण आले आहे. कुडित्रे फॅक्टरी व सांगरूळ फाटा येथे अनेक राष्ट्रीय बँकाचे एटीएम तसेच सहकारी बँका आहेत. त्याचबरोबर शिक्षणाचे मुख्य केंद्र म्हणून हा परिसर पुढेआला आहे. येथे रोडरोमिओंचा मुलींना नाहक त्रास सुरू आहे. यातून मोठी जीवघेणी युवकांच्यात लाथाळी झाली होती, तर दोन वर्षांपूर्वी येथे तीन ज्वेलरीची दुकाने व एक घरफोडी होऊन लाखोंचा माल चोरट्यांनी पसार केला होता. सांगरूळ येथील चोरी ही याचवेळी झाली होती.
सांगरूळ पोलीस चौकीला कायमच कुलूप
By admin | Updated: June 13, 2015 00:28 IST