सातारा : तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईत पाण्याचा थेंब न् थेंब वाचविणे अत्यंत गरजेचे बनले आहे. लोकांना घसा ओला करण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. त्यामुळे पाणीबचत काळाची गरज असून आता पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला छोटे नळ जोडून पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी वाया जाऊ नये, यासाठी शासन आणि खासगी टँकरला खास नळाची सोय करण्यात आली आहे.‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अगदी युवकांपासून ते गृहिणी, छोटे-मोठे व्यावसायिकही ‘जलमित्र’ बनून पाणीबचत करून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत. तसेच जलसाक्षरता वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.सातारा जिल्ह्यातील खटाव आणि माण हे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वांत जास्त फटका या तालुक्यांना बसला आहे. कारण या भागात पावसाचे प्रमाणच कमी आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे होऊनही त्यामध्ये पाणीसाठा होत नाही. म्हणून येथील लोकांना पाण्याचे महत्त्व जास्त आहे. पाण्याचा थेंबन्थेंब वाचावा, यासाठी नागरिक स्वत:हून काळजी घेत असतात. या तालुक्यांमध्ये शासनाने तसेच खासगी संस्था, व्यक्तींनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. पूर्वी टँकरच्या टाकीला मोठी पाईप असायची. त्यातूनच पाणीवाटप केले जायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. ही बाब लक्षात आल्यामुळे आता प्रत्येक टँकरला नळ बसविण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिकांनी नळाद्वारेच पाणी भरावे. पाणी भरून झाल्यानंतर नळ बंद करता येतो, त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता नसते. काही नागरिक बॅरलमध्ये पाणी भरून घेतात. त्यांच्यासाठी टँकरला मोठ्या पाईपचे कनेक्शनही ठेवण्यात आले आहे. कमी वेळेत आणि पाणी वाया न घालविता पाणीवाटप केले जात आहे. ज्या टँकरला नळाची व्यवस्था नाही ते टाकीमध्ये छोट्या पाईप टाकून भांडी भरून देत आहेत. (प्रतिनिधी)ोदुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याची बचत केली जावी, यासाठी टँकरला नळाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नळाखाली भांडी ठेवून पाणी भरल्यास पाणी वाया जाणार नाही. त्यामुळे आपोआपच पाणीबचत होणार आहे. - अमोल दणाणे, टँकरचालक
पाणी वाचविण्यासाठी टँकरला बसविल्या तोट्या !
By admin | Updated: May 27, 2016 00:02 IST