वीज ग्राहकांची थकीत बिले, हा सध्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. गावोगावी बिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांमागे अक्षरश: भुंगे लागलेत. वायरमन सकाळ, दुपार, संध्याकाळ ग्राहकांच्या घरी चकरा मारतायत. उंबरे झिजवतायत. कनेक्शन तोडण्याची धमकीवजा सूचना देतायत. एकूणच थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज कंपनीने ग्राहकांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. मात्र, एकीकडे हे सुरू असताना दुसऱ्या बाजूला वीज कंपनीचा अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर येतोय. कऱ्हाड तालुक्यातील सुपने गावातील प्रकार हा त्याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण.
सुपनेतील गुलाब पठाण या युवकाचा ग्रामपंचायतीच्या गाळ्यात व्यवसाय होता. या व्यवसायासाठी त्याने वीज कनेक्शन घेतले होते. मात्र, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याने व्यवसाय इतरत्र हलविला. त्यामुळे वीज कनेक्शन सोडवून त्याने मीटरही रितसर वीज कंपनीत जमा केले. मीटर जमा करत असल्याचा लेखी अर्जही त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दिला. मात्र, डिसेंबर महिन्यात संबंधित युवकाला त्याच्या व्यवसायाच्या कनेक्शनचे वीज बिल आले. युवकाने याबाबत वायरमनकडे विचारणा केली. वायरमनने हात झटकले. कार्यालयात जाऊन भेटण्याचा सल्ला त्याने दिला. त्यानुसार गुलाब वीज कंपनीच्या मुंढे येथील कार्यालयात गेला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला हे बिल भरा, नंतर बिल येणार नाही, अशी गळ घातली. गुलाबने बिल भरले. पुन्हा बिल येणार नाही, असे समजून तो निर्धास्त झाला; पण पुढच्याच महिन्यात आणखी एक बिल त्याच्या हातात पडले. मार्च महिन्यातही त्याला फेब्रुवारीपर्यंतचे थकीत रकमेचे बिल देण्यात आले आहे. कनेक्शन नसतानाही पाठविल्या जाणाऱ्या या बिलांमुळे गुलाब पठाण हा युवक हतबल झाला आहे. दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न सध्या त्याला सतावतोय.
- चौकट
वायरमनचे कानावर हात
सुपने गावात थकीत बिलाच्या वसुलीसाठी अक्षरश: घोड्यावर बसून येणारा वायरमन गुलाब पठाणच्या तक्रारीबाबत मात्र कानावर हात ठेवतोय. मी काय करू, असे म्हणून तो जबाबदारी झटकतोय. मॅडमना सांगा, साहेबांना भेटा, अशी त्याची घोकंपट्टी सुरू असते. त्यामुळे वायरमन ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी आहे की फक्त वसुलीसाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय.
- चौकट
साहेब म्हणे... बिल भरावेच लागेल!
मार्च महिन्यातील बिल हातात पडल्यानंतर गुलाल वीज कार्यालयात गेला. त्याने तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कनेक्शन सोडवून आणि मीटर जमा करून चार महिने झालेत. मग बिल कसलं, याची विचारणा त्याने केली. त्यावर तेथील अधिकाऱ्यांनी तुम्हाला बिल भरावेच लागेल, असे सुनावल्याचे गुलाब सांगतो.
- चौकट
रिडींग कशाचं घेतलं?
गुलाबने कनेक्शन सोडवून आणि वीज कंपनीत मीटर जमा करून चार महिने झालेत. मात्र, तरीही चालू रिडिंगप्रमाणे त्याला बिल पाठविण्यात आले आहे. जर मीटरच नाही तर रिडिंग कशाचं घेतलं, हा संशोधनाचा विषय आहे.