औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीज कनेक्शन तोडण्यात आल्यामुळे कौशल्य विकास यांत्रिकीकरण विभाग बंद होता. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. काही विद्यार्थी याठिकाणी निवास करतात. त्यांना विजेअभावी अंधारात चाचपडत राहावे लागत होते. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याचा आणि डासांचा त्रास सहन करावा लागत होता. अंधाराचा फायदा घेऊन चोरीसारखे प्रकार घडत होते. त्यामुळे तातडीने वीज कनेक्शन जोडावे. कनेक्शन न जोडल्यास संस्थेसमोर आंदोलन करु, असा इशारा भाजप युवा मोर्चाच्यावतीने देण्यात आला होता. जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी याबाबतचे निवेदन प्रभारी प्राचार्य एस. आय. भोसले यांना दिले होते. त्यावेळी पैलवान अक्षय चव्हाण, किशोर साळवे, श्रीकांत झेंडे, प्रशांत कदम आदी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सचिव निवास जाधव यांनी गृहराज्यमंत्री व कौशल्य विकास मंत्री शंभुराज देसाई तसेच अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. अखेर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन वीज कनेक्शन पूर्ववत जोडले.