भुर्इंज : महाबळेश्वर येथे उगम पावून व वाई येथून पुढे वाहत येणाऱ्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी १९७२ सालानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. सध्याची पाणीपातळी पाहून बागायती भाग असणाऱ्या भुर्इंज परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या अनेक वर्षांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. मात्र, त्याची झळ भुर्इंज परिसराला कधी बसली नाही. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. १९७२ मध्ये भुर्इंज, ता. वाई परिसरात कृष्णा नदी आटली होती. नेमकी तीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या धरणांतून पाणी सोडणे बंद आहे. ओढे, नाले केव्हाच आटले आहेत. नदीत थोडे फार पाणी वाहते आहे. हे पाणी धोम धरणात थोड्या प्रमाणात शिल्लक असणाऱ्या साठ्यातील झिरपणारे पाणी आहे. ते एवढे कमी आहे की नदीचा तळ कधी नव्हे तो दिसू लागला आहे. १९७२ नंतर अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याने दुष्काळाची तीव्र चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. (वार्ताहर)पाणीदार भागातील भयानक स्थिती...नदीचे पाणी आटले आहे. कालव्यात पाणी नाही. त्यामुळे परिसरातील विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. सवय नसलेल्या येथील जनतेला ही दुष्काळसदृश स्थिती किती रडवणार याची धास्ती सर्वांना लागली आहे. मुळातच या पाणीदार भागात एक दिवस जरी नळाला पाणी नाही आले की आरडाओरड सुरू होते. आता दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१९७२ नंतर प्रथमच कृष्णेची पातळी कमी
By admin | Updated: November 15, 2015 23:52 IST