ओगलेवाडी : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दैवत व सुखदुःखाच्या क्षणाचा सोबती असलेला बैल हा पाळीव प्राणी असल्याने बैलाला पशू व जंगली प्राण्याच्या यादीतून तत्काळ वगळावे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी विनाविलंब सुरू करून शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू कराव्यात. यासाठी सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. पत्राची प्रत बैलगाडी संघटनेला देत राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही दिली आहे.
सह्याद्री कारखान्याचे संचालक रामदास पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्या हस्ते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पत्राची प्रत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष उदयसिंह पाटील यांना देण्यात आली. यावेळी विलास देशमुख, अधिक सुर्वे, मिलिंद सुर्वे, हणमंत वनवे, सुरेश पाटील, बी. एम. पाटील, सतीश भोसले, युवराज पाटील, सुहास पाटील, गणेश गुरव, महेश शिंदे, मोहसीन पटेल, दादा डुबल, शंकर निकम उपस्थित होते.
प्रशांत यादव म्हणाले, ‘गोधन वाचविण्यासाठी व वाढविण्यासाठी बैलगाडी शर्यत सुरू होणे गरजेचे आहे. बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली आहेत. बैलगाडी शर्यतप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीच्या लढ्यात शेतकरी व बैलगाडी प्रेमींच्या सोबत राष्ट्रवादी पूर्ण ताकतीने उतरेल. ज्यावेळी बैलगाडी शर्यतीला मान्यता मिळेल. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्वात पहिली बैलगाडी शर्यत ही सदाशिवगड विभागात आयोजित केली जाईल.’
रामदास पवार म्हणाले, ‘बैलगाडी शर्यत हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. खिलार गाय व बैल पैदास व उत्तम संगोपन होण्यासाठी बैलगाडी शर्यत सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बैलगाडी संघटनेला पाठिंबा दर्शविला आहे.