हिंदू संस्कृतीत सण, उत्सवांना मानाचे स्थान आहे. प्रत्येक उत्सवाला परंपरा अन् इतिहासाची किनार लाभली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडीदेखील एक महत्त्वाचा उत्सव. आपण आजवर या उत्सवाकडे केवळ एक जल्लोष म्हणून पाहात आलो आहोत, पण हा उत्सव आपल्याला जगण्याचा अर्थही सांगून जातो. तरुण एकमेकांना सावरत मानवी मनोरा उभा करतात. आपल्याला काहीही करून आपलं लक्ष गाठायचंय, असा धीर देतात अन् गोविंदा दहीहंडी फोडून आपलं लक्ष गाठतो. खरंतर दहीहंडी हा उत्सव आनंद देऊन जाणारा असला, तरी एकमेकांचा हात धरणं, सावरणं म्हणजेच ‘दहीहंडी’ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
बालगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे, यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे; पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. यादिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे आदी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्याचा विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांतील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे तरुणाईत थोडा निरुत्साह आहे. मात्र, दहीहंडीच्या मनोऱ्याप्रमाणे जो-तो एकमेकांना सावरत, आधार देत कोरोना संकटाची ‘हंडी’ फोडण्याचा प्रयत्न करत आहे.
कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही गंभीर बनला. अशा संकटकाळात जो-ता एकमेकांच्या मदतीसाठी धावून आला. एकमेकांच्या हातात हात देत ‘दहीहंडी’प्रमाणे माणुसकीचा मनोरा उभा राहिला. या मनोऱ्याने कधी अडखळत, तर कधी स्वत:ला सावरत अनेक कुटुंबांना जगण्याचे बळ दिले. आज एकमेकांचा हात धरणं, सावरणं म्हणजेच ‘दहीहंडी’ ही नवी संकल्पना आता रुजू लागली आहे.