पाचवड : ‘किसन वीर साखर कारखाना यंदा ५०वा गळीत हंगाम साजरा करीत आहे, परंतु गेल्या काही वर्षांत साखर उद्योग अनेक अडचणींतून मार्गक्रमण करीत आहे. अनेक संकटे उभी राहिली, पण सर्वांच्या सहकार्यातून संकटावर मात करता आली आणि येणाऱ्या अरिष्टांवरही शेतकरी सभासदांच्या विश्वासावर मात करू,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभा खेळीमेळीत पार पडली.
भुईज, ता.वाई येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ४९व्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी ते बोलत होते. संचालक सीए सी.व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रवीण जगताप, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या नियमानुसार ही सभा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी बांधवांनी जास्तीतजास्त ऑनलाइन नोंदणी करून सभेत उपस्थिती दाखवत, जो व्यवस्थापनावर विश्वास दर्शविला, त्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कारखान्याची सूत्रे हाती आल्यानंतर शेतकरी हिताचे निर्णय घेताना संस्थेचे नुकसान होऊ नये, याची दक्षता नेहमीच घेतली. संस्थेच्या हितास बाधा येईल, असे वर्तन कधीही माझ्याकडून अथवा व्यवस्थापनाकडून झालेले नाही व यापुढील काळातही होणार नाही. शेतकरी सभासद हे कारखान्याचे मालक असून, त्यांना कारखान्याविषयी माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.
ऑनलाइन सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष मदन भोसले यांनी उत्तर दिले, तर सभेत पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. विषय पत्रिकेचे वाचन सचिव एन.एन. काळोखे यांनी केले, तर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले.
कोट : कारखान्याची सूत्रे शेतकरी सभासदांच्या विश्वासावर हाती घेतली. त्यानंतर, सभासद, कर्मचारी आणि कारखान्यासाठी उपयुक्त घटकांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे कार्यस्थळावर अनेक नवनवीन प्रकल्प उभे करता आले, याचा विशेष आनंद आहे.
- मदन भोसले, अध्यक्ष किसन वीर साखर कारखाना
.......................................
फोटो ओळ : भुईज, ता.वाई येथील किसन वीर साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मदन भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्यासह संचालक उपस्थित होते. (छाया : महेंद्र गायकवाड)
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\