ग्रामीण भागात प्रवेश नाममात्र : खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दहावीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाही ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये हजेरी लावण्याची सक्ती नसल्याने येथे नाममात्र प्रवेश घेऊन खासगी शिकवणी वर्गात नियमित हजेरी लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
कोरोना महामारीमुळे गतवर्षीसारखं हेही वर्ष ऑनलाईन शिक्षणात जाणार असेल तर मोठ्या शहरांमध्ये महागड्या फी भरून प्रवेश घेणं पालक टाळत आहेत. त्याऐवजी खासगी क्लास लावून महाविद्यालयात न जाता अभ्यास करण्याचा पर्यायी मार्ग पालकांनी शोधला आहे. महाविद्यालय आणि खासगी क्लास या दोन्हींची भरमसाठ फी भरण्यापेक्षा ग्रामीण भागातील महाविद्यालये खर्चाच्या पातळीवरही पालकांना परवडणारे आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असायची. यंदा मात्र शहराएवढंच महत्त्व ग्रामीण भागातील महाविद्यालयांना आल्याने तेथेही प्रवेशासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरांच्या तुलनेत गावाकडील महाविद्यालयांची फी कमी आणि पालकांना परवडेल, अशीच आकारली जाते. त्यामुळे खेड्याकडे चला, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
चौकट :
गावात प्रवेश का?
कॉलेजमध्ये न जाता केवळ परीक्षांपुरते जाता यावे, हे ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचे मुख्य कारण आहे. तेथे उपस्थितीची अट नसल्याने आणि परीक्षेच्या वेळीही महाविद्यालयांकडून विशेष सवलत देण्याची खात्री दिली जाते. ग्रामीण भागात प्रवेश घेऊन शहरात क्लासेस करण्यासाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळताना दिसतात. त्यामुळे अकरावी, बारावीच्या वर्गातील उपस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पॉईंटर
एकूण विद्यार्थी : ३३,२८७
बारावी महाविद्यालय संख्या : ६३५
मुले : १७,८७०
मुली : १५,४१७
ऑफलाईन प्रवेश व्हावेत
यावर्षी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरीही सीईटी देणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे सध्या केवळ नोंदणी सुरू केली आहे. शिक्षण उपसंचालकांनी अकरावी सीईटीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश निश्चिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सीईटीनंतर मेरिट लिस्ट लावून प्रवेश निश्चित करता येईल.
- प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवाळ
अद्याप शासनाच्या स्पष्ट सूचना नाहीत. अकरावी सीईटीनंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश ऑफलाईन असले तरीही ग्रामीणकडे ओढा दिसतेय. सीईटी सक्तीची आवश्यक करणे योग्य ठरले असते. विद्यार्थ्यांकडून विचारपूस सुरू आहे. प्रवेश समिती त्यांची नावे नोंदवून पुढील सूचना देत आहे.
- प्राचार्य डॉ. उत्तमराव पवार
कोट :
गावातल्या शाळेतच अकरावी, बारावीचे वर्ग आहेत. इथेही नियमित वर्ग भरतात, त्यामुळे गावातच प्रवेश घेतला आहे. शहरात राहून शिकण्यावर खूप खर्च होणार. तो करणे पालकांना शक्य होणार नाही. सोबतच्या मैत्रिणीही गावातच प्रवेश घेणार आहेत.
- साक्षी इनामदार, कोडोली
गावाशेजारी महाविद्यालय आहे. तिथे अकरावीला प्रवेश घेऊन मोठ्या शहरात कोचिंग क्लासेस करणार आहे. त्यामुळे अकरावी सीईटीत वेळ घालवणार, नीट परीक्षेची तयारीही करायची आहे. परीक्षेवेळी गावाकडे जाऊन परीक्षा देईन. शहरात रूम घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आहे.
- प्रणव सावंत, गुरुवार पेठ