सातारा : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानास जिल्ह्यात सुरुवात झाली असून, ३० नोव्हेंबरपर्यंत हे राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे '' कॅच द रेन'' (चला पाऊस पकडूया) हे ब्रीदवाक्य आहे.
जलशक्ती अभियानांतर्गत विविध कामे सुचविण्यात आली आहेत. त्यामध्ये जलसंधारण आणि पुनर्भरण यासंबंधी पावसाळ्यापूर्वी तयारी करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे, तर ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांत जलसंधारणाची कामे राबविण्याचे प्रस्तावित आहे. या अभियानासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे जिल्हा नोडल अधिकारी आहेत. तसेच उपजिल्हा स्तरावर उपविभागीय अधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी असणार आहेत. विविध विभागांतर्गत येणाऱ्या नरेगा कामात सिंचन व जलसंधारणाची कामे, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत कामे हाती घेतली जाणार आहेत. पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, भूजल पुनर्भरण, पाऊस आणि संकलन, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर, जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन आणि नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. ज्या ठिकाणी आवश्यक तेथे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनच्या बाबी १५ व्या वित्त आयोग निधीतून स्थानिक स्तरावर नरेगा समवेत करण्यात याव्यात असे सांगण्यात आले आहे. तसेच ग्रामसभा व मासिक सभेचे आयोजन करून जलशपथ घ्यावी आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत चर्चा करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वन क्षेत्रात पाऊस आणि संकलनाची साधने निर्माण करावीत. मान्सून काळात वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने खड्डे व रोपे तयार ठेवावीत. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी छतावरील पाणी संकलनाचे अभियान काळात नियोजन करावे, असेही यामध्ये अंतर्भूत आहे.
हे अभियान चार टप्प्यात राबवायचे आहे. यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानाअंतर्गत जनजागृती करने, कामाचा वार्षिक कृती आराखडा तयार करणे, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी आणि तालुका यंत्रणांकडून आराखाड्यातील कामाचे सनियंत्रण करणे व वेळोवेळी झालेल्या आणि केलेल्या कामांची संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करणे, असे हे चार टप्पे असणार आहेत.
.........................................................................