तळमावले : पाटण तालुक्यातील काळगांवजवळील येळेवाडी या गावात मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी सातच्या सुमारास बिबट्या शिरल्यामुळे गावात एकच थरकाप उडाला. कुत्री आणि पाहायला आलेल्या लोकांनी पाठलाग केल्याने घाबरलेला बिबट्या झाडावर चढून बसला आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन सुमारे अर्ध्या तासानंतर तो खाली उतरुन परिसरातील शिवारात पसार झाला.भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा मोकाट कुत्र्यांनी पाठलाग केला. कुत्र्यांच्या भुंकण्याने घाबरलेला बिबट्या येळेवाडीजवळील डोंगरानजीक असलेल्या झाडावर गेला. कुत्री आणि त्यांनी केलेला गोंगाट यामुळे घारी आणि कावळे बिबट्याच्या सभोवताली फिरू लागले. या सर्वांचा कलकलाट ऐकून येळेवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला झाडावर चढलेला पाहून ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. वनक्षेत्रपाल सतीश साळी, मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे व अन्य कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बिबट्याला बघण्यासाठी परिसरामध्ये गर्दी जमली होती. त्यामुळे घाबरून बिबट्याला झाडावर चढून बसला होता. बघ्यांची गर्दी वाढत असल्यामुळे त्याची चलबिचल सुरू होती. वन कर्मचारी व पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकांना बाजूला हटवून बिबट्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग रिकामा केला. त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन बिबट्याने सुमारे अर्ध्या तासानंतर झाडावरून खाली उतरला अािण परिसरातील शिवारात निघून गेला. (वार्ताहर)बिबट्या शिवारात तरी भीती मनातबिबट्या जंगलात निघून गेल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी लोकांमध्ये घबराटीचे वातावरण कायम आहे. रस्त्याने येता-जाताना नागरिक घाबरत आहेत. वनविभागाने याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज असून लोकवस्तीत येणाऱ्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशा मागणी ेजोर धरू लागली आहे.मालकासमोरच घातली होती रेड्यावर झडपनोव्हेंबर महिन्यात कुठरे सुपुगडेवाडी हद्दीत वाझोली फाट्याजवळ चरावयास सोडलेल्या जनावरातील बादेवाडी येथील रघुनाथ सावंत यांच्या रेड्यावर बिबट्याने झडप घालून त्या जागीच ठार केले. ही घटना सावंत यांच्यासमोरच घडल्याने त्यांनी तेथून कसाबसा पळ काढत घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली. याची माहिती त्यांनी वनविभागालाही दिली होती. पण या लोकांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. याच कालावधीत बिबट्याने ५ ते ६ शेळ्या, पाळीव कुत्री यांच्यावर हल्ला करुन फडशा पाडला होता. त्यानंतर बिबट्याने मारुन टाकलेल्या शेळ्या परिसरात सापडल्या होत्या.
कुत्र्यांमुळे बिबट्या अर्धा तास झाडावर
By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST