राहिद सय्यद -- लोणंद --लोणंद नगरंपचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रचारामध्ये मोठी रंगत आली आहे. असे असतानाच मातब्बर नेत्यांच्याच प्रभागामध्येच मात्र समस्या जैसे थे आहेत. नेते प्रचारात दंग असताना जनता मात्र समस्यांचा सामना करताना दिसत आहे. लोणंद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे. त्यानंतर प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. मात्र हे होत असताना येथील प्रभागांना विविध समस्यांनी ग्रासल्याचे दिसून येत आहे. येथील प्रभाग १५, १६, १७ हे पूर्वी ग्रामपंचायतचा वॉर्ड ६ होता. आता त्याचे तीन प्रभाग झाले आहेत. प्रभाग १५ हा शिवाजी चौक दक्षिण भाग परिसर आहे. येथील आरक्षण सर्वसाधारण महिला वर्गासाठी असून येथील मतदारसंख्या ५८० इतकी आहे. येथे प्रामुख्याने पिण्याचे पाणी, गटारे, अंतर्गत रस्ते अशा अनेक समस्या दिसून येत आहेत. येथील काही ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतालयात पाण्याची सोय नाही. तसेच अंतर्गत रस्त्याचा अभाव आहे. प्रभाग १६ हा सईबाई हौसिंग सोसायटी, सातारारोड पूर्वभाग परिसर आहे. सोसायटीच्या उत्तर भागाकडे लोणंद गावातील गटाराचे सांडपाणी सोडल्याने सोसायटीत या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, डास, घाणीचे साम्राज्य दिसून येते. येथील आरक्षण सर्वसाधारण असून, मतदार संख्या ५२४ इतकी आहे. तसेच येथील सोसायटीत येण्या-जाण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत आहे. सोसायटीच्या मार्गावर भुयारी मार्ग झाला पाहिजे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, चिल्ड्रन पार्क आणि व्यायाम शाळेची मोठी गरज आहे.प्रभाग १७ हा लोणंद नगरपंचायतीचा सर्वात मोठा ३ किलोमीटर अंतराचा प्रभाग आहे. हा खोतमळा, फुलेनगर, सावित्रीबाई नगर, ठोंबरे मळा, कुरणवस्ती अशा परिसराचा प्रभाग आहे. येथे सर्वसाधारण महिला आरक्षण असून, मतदार संख्या ८८० आहे. हा प्रभाग चार वाड्या-वस्त्यांवर विभागला आहे. कायमच दुर्लक्षित राहिलेला हा प्रभाग आहे. या वाड्या-वस्त्यांवर कोणतीही सुविधा आत्तापर्यंत पोहोचविली गेली नाही. त्यामुळे तेथील सार्वजनिक स्वच्छतालय, गटार, कचराकुंडी, मुतारी असे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला उघड्या स्वरूपात असलेल्या गटारातून सांडपाणी सोडले जात आहे. उघड्या गटारातून जाणारे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरवित आहे. त्यामुळे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागतो. बंदिस्त गटाराचे नियोजन होण्याची आवश्यकता आहे. प्रभाग १५ मध्ये अंतर्गत रस्ते व गटारे, कचराकुंडी नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यात टाकावा लागत आहे. त्यामुळे गटारे तुंबून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रोगराई पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.- नानासो जाधव, प्रभाग १५लोणंदमधील सईबाई सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांसाठी गार्डन झाले पाहिजे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थानाची व्यवस्था झाली होण्याची गरज आहे. तसेच बंदिस्त गटारे योजना राबवावी.- दत्तात्रय कचरे, प्रभाग १६गावातून मळ्याकडे येताना रेल्वेलाईन क्रॉस करून यावे लागते. तेथे भुयारी मार्ग होण्याची अत्यंत गरज आहे. जांभळीचा मळा, खोत मळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. आमच्याकडून दिवाबत्ती कर, घरपट्टी घेतली जाते. परंतु आम्हाला ग्रामपंचायतीने आजपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा पुरविल्या नाहीत.- मंगेश क्षीरसागर, प्रभाग १७
नेते प्रचाराच्या गर्दीत; जनता समस्यांच्या गर्तेत
By admin | Updated: April 2, 2016 00:17 IST