सातारा : सातारा पालिकेकडून जरंडेश्वर नाका ते जिल्हा परिषद या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. या कामाला अडथळा ठरणाऱ्या झोपड्या मंगळवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या.
पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानांतर्गत भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी व लक्ष्मीटेकडी येथे घरकुलांची उभारणी केली आहे. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत ११० घरकुले असून, त्यांचे पाच इमारतीत, तर लक्ष्मीटेकडी येथे ३५२ घरकुले असून, त्याचे अकरा इमारतीत विभाजन केले आहे. पालिकेने ड्रॉ काढून भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील रहिवाशांना सदनिकांचा ताबा दिला आहे. त्यांच्या झोपड्या मात्र अद्यापही आहे त्याच जागेवर उभ्या आहेत.
पालिकेकडून जरंडेश्वर नाका ते जिल्हा परिषद या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. या मार्गावर असलेल्या झोपड्यांमुळे रुंदीकरणाच्या कामात बाधा निर्माण होत असल्याने त्या हटविण्याची मोहीम पालिकेने मंगळवारपासून हाती घेतली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी एक जेसीबी, एक टीपर व आठ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिवसभरात चार झोपड्या जमीनदोस्त केल्या. बुधवारीदेखील उर्वरित झोपड्या हटविल्या जाणार आहेत. मुख्याधिकारी अभिजित बापट, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
फोटो : ०५ जावेद खान
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या सदर बझार येथील झोपड्या जमीनदोस्त केल्या. (छाया : जावेद खान)