याबाबत माहिती अशी की, वाई ब्राह्म समाज यांनी वाई नगरपालिकेच्या पत्राचा व संस्थेला केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देऊन शाळा प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता रविवारी (दि. १४) सुटीच्या दिवशी शाळेत प्रवेश करून वर्गांची कुलपे तोडून शाळेतील संगणक, इलेक्ट्रिक वस्तू, महत्त्वाच्या कागदपत्रांसह शालेय साहित्य समोरील मोकळ्या जागेत ठेवले होते. यानंतर शाळेने त्यांच्याविरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोमवार व मंगळवारी (दि. १५ व १६) आठवी ते दहावीच्या मुलींनी शाळेच्या परिसरातील झाडाखाली बसून शिक्षण घेतले; परंतु बुधवारी जागामालकाने शाळेच्या मुख्य दाराला कुलूप लावल्याने सर्वांना धक्का बसला. भर उन्हात मुलींनी प्रार्थना म्हटली व तेथेच रस्त्याच्या कडेला अभ्यास करत बसल्या होत्या.
संस्था, लोकप्रतिनिधी, जागामालक यांनी लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढून मुलींच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी पालक तसेच वाईकर नागरिकांकडून केली जात आहे. यावेळी मुख्याध्यापिका शकुंतला ठोंबरे, माजी प्राचार्य राजकुमार बिरामणे, शालेय समितीचे अशोकराव सरकाळे, उषा ढवण, शिक्षक उपस्थित होते.
चौकट :
मानवतेला काळिमा फसणारे कृत्य
समाजातील सर्वसामान्य मुलींना या शाळेत शिक्षण देण्याचे काम सुरू होते. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती मुलींच्या शिक्षणासाठी या शाळेला मदत करीत होत्या. शाळेची स्थिती पाहून मुलींना अश्रू अनावर झाले होते. शाळा हे ज्ञानमंदिर असून त्याची नासधूस करणे व शाळेला कुलूप लावणे हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य आहे, असा आरोप शाळा समितीचे सदस्य अशोकराव सरकाळे यांनी केला.
१७वाई-स्कूल
वाईतील रविवार पेठेतील मुलींच्या शाळेला कुलूप लावल्याने मुलींनी बुधवारी भरउन्हात प्रार्थना म्हणून रस्त्याच्या कडेलाच अभ्यास केला. (छाया : पांडुरंग भिलारे)