सातारा : आपल्या लाडक्या बाप्पाला अत्यंत भक्तिभावाने निरोप देणाऱ्या अनेक सातारकरांच्या डोळ्यात पाणी तरळले जेव्हा त्यांनी मंगळवार तळ्यात बाप्पांची छिन्न विछिन्न अवस्था पाहिली! तर याच अवस्थेतील बाप्पा पाहून काहींना आर्थिक नांदीही जाणवली. विसर्जित मुर्ती आणि बाप्पांचा मोठ्या पाटात वापरलेले लोखंड चोरून काहींनी अशा अवस्थेतही लक्ष्मी दर्शन घडवले.गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी मंगळवार तळे गाजत आहे. कधी प्रदुषणामुळे तर कधी मोठ्या मुर्तींच्या विसर्जनामुळे. तळ्याचं रूपड बदलावं आणि नेटकसं तळ आपल्या आसपास असावं फक्त एवढीच आस येथील स्थानिक लावत आहे. पण नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न या म्हणी प्रमाणे तळ्याच्या शुभोभिकरणाचा मुहूर्त अद्याप तरी कोणाला सापडला नाही दिसते. नोव्हेंबर महिन्यात तळ्यात विसर्जित मुर्तींमुळे दुर्गंधी पसरली होती. याविषयी ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर पालिकेने तातडीने कारवाई करत तळ्याची स्वच्छता करण्यास सुरूवात केली. गेल्या काही दिवसांपासून तळ्यातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. बऱ्यापैकी पाणी निघाल्यामुळे तळ्यात छिन्न विछिन्न अवस्थेतील मुर्तींचे दर्शन घडू लागले आहे. बहुतांश लोकांनी यात धार्मिकता पाहिली, तर काही चाणाक्ष चोरट्यांनी यात पैसे पाहिले. गेल्या काही दिवसांपासून मंगळवार तळ्यात काही अज्ञात व्यक्ति येवून रोज तळ्यात उतरत आहेत. त्यांच्यासोबत एक मोठे प्लास्टिकचे पोते आहे. दुपारी नागरिकांच्या विश्रांतीच्या वेळेत हे दोघे तीघे जण तळ्यात उतरतात. सुमारे वर्षभर पाण्यात मुर्ती बुडून राहिल्याने यातील लोखंड गंजले आहे, त्यामुळे ते वाकवून तोडून नेणे चोरट्यांना सहज शक्य आहे. (प्रतिनिधी)एकमेका सहाय्य करू...!मंगळवार तळे परिसरात दुपारच्या वेळी हातात प्लास्टिकचे पोते घेवून काही लोक फिरतात. कोणाचेही लक्ष आपल्याकडे नाही याची खात्री करून ते तळ्याच्या भिंतीवर चढतात. तळ्यातील पाणी काढल्यामुळे बहुतांश मुर्ती दर्शनी स्वरूपात असल्याने याचा फायदा हे चोरटे घेत आहेत. पाटाला असलेल्या दोरीच्या सहाय्याने खाली उतरून हे चोरटे पाटाचे अँगल, मुर्तींच्या अवयवांमध्ये असलेले लोखंडी बार वाकवून ते पोत्यात भरतात. एकमेका सहाय्य करू या प्रमाणे एकजण पहारा करायला आणि दुसरा जण लोखंड चोरण्यात मग्न असतो. एका दिवसाचे इच्छित लोखंड जमा झाले की दुसऱ्याच्या मदतीने वर येवून बघता बघता ते दोघेही गर्दीत नाहीसे होतात.
विसर्जित मूर्तींमधूनही लक्ष्मी दर्शन !
By admin | Updated: December 10, 2014 23:57 IST