लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काळ बदलत गेला तशा लोकांच्या गरजाही बदलत गेल्या. तसाच बदल वाहनांच्या बाबतीतही झाला आहे. सायकलीच्या जागी आता दुचाकी व चारचाकी गाड्या आल्या असून, प्रत्येक घरात आज एकतरी गाडी आहेच. मात्र, ‘लाख’मोलाच्या गाडीसाठी पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने हजारो गाड्या आज रस्त्यावरच लावल्या जात आहेत. या गाड्या वाहतुकीला अडथळा ठरू लागल्या आहेत.
सातारा शहराचा विस्तार हळूहळू वाढू लागला असून, वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. जिल्ह्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या तब्बल ८ लाख ६४ हजार इतकी आहे. यापैकी एकट्या सातारा शहर व परिसरात पावणे दोन लाखांहून अधिक गाड्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही बांधकामाचा परवाना देताना इमारतीला पार्किंगची अट बंधनकारक केली आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांकडून याकडे दुर्लक्ष करून गाळे बांधले जात आहेत. परिणामी पार्किंगसाठी जागाच उरली नसल्याने ‘लाख’मोलाची गाडी रस्त्यावर उभी केली जात आहे. शहरातील रस्त्यांवर अशा हजारो दुचाकी व चारचाकी गाड्या लावल्या जातात.
या वाहनांमुळे रस्ते अरुंद होऊ लागले असून, आता पोलिसांच्या वाहतूक शाखेने देखील कारवाईचा फास अधिक आवळला आहे.
(चौकट)
वाहन मालकावर
दंडात्मक कारवाई
सातारा शहरात वाहनतळाची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनांसाठी जागा निर्धारित केली आहे. मात्र वाहनांची संख्या अधिक असल्याने ही जागा पार्किंगसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर, नो-पार्किंगमध्ये तसेच गल्लीबोळात वाहने लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाहतूक शाखेकडून दुचाकी चालकावर २०० तर चारचाकी वाहनावर ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे.
(चौकट)
शाहू चौक ते बोगदा
मार्ग त्रासदायक
शाहू चौक ते बोगदा हा रस्ता मुळातच अरुंद आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. कास, बामणोली, सज्जनगड, परळी अशा महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा घरांची संख्याही अधिक आहे. या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता वाहनधारकांना नेहमीच त्रासदायक ठरतो.
(पॉइंटर्स)
शहराची लोकसंख्या : २,३०,०००
दुचाकीची संंख्या : १,०१,०८९
चारचाकीची संख्या : ८५,०३०
फोटो : १७ फोटो ०१/०२/०३/०४