माणिक डोंगरे-- मलकापूर -प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो; मात्र तो छंद जोपासण्याचा प्रयत्न करीत येणाऱ्या अडचणींवर मात करायची व संधीचे सोने करून दाखवायचे, अशी वेळ क्वचितच मिळते. पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत खराडे यांनाही अशीच संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. लगोरीच्या साह्याने नेमबाजीचे धडे घेतलेल्या शशिकांत यांनी पोलिस खात्यात भरती झाल्यानंतर बारा वेळा राज्य पातळीवर यश मिळवून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली. कऱ्हाड तालुक्यातील काले हे पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत खराडे यांचे मूळ गाव आहे. पत्नी अश्विनी व अमोल, अर्जुन या दोन मुलांसमवेत हे कुटुंबीय सध्या कऱ्हाडातच वास्तव्यास आहेत. शशिकांत यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातीलच शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण कऱ्हाड येथे झाले. त्यांना लहाणपणापासूनच नेमबाजीचा छंद. त्यासाठी त्यांनी लगोरीच्या साह्याने नेमबाजीचे धडे गिरवले. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी १९९० मध्ये ‘अॅप्लिकेशन फायरिंग’ प्रकारात राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक पटकाविले. १९९१ मध्ये ते सातारा येथे पोलिस दलात भरती झाले. खात्यातील आपले कर्तव्य चोख बजावत त्यांनी आपला नेमबाजीचा छंदही जोपासला. मिळेल त्या साधनांद्वारे सराव करीत १९९६ मध्ये त्यांनी खात्याअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन चौथा क्रमांक पटकाविला. त्यानंतर १९९९ ते २०१६ या १६ वर्षांच्या कालखंडात त्यांनी १२ वेळा राज्य स्तरावर पहिला किंवा दुसरा क्रमांक पटकावण्याची किमया केली. या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून २०१४ मध्ये ३०० मीटर थ्री पोजिशन प्रकारात राज्य पातळीवर त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी कांस्य पदक पटकाविले. एका बाजूला छंद, तर दुसऱ्या बाजूला कर्तव्य ही सांगड घालत शशिकांत यांनी वीस वर्षं पोलीस दलात सेवा केली आहे. या वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी सातारा, उंब्रज, कऱ्हाड शहर, कोयनानगर येथे ड्यूटी बजावली. सध्या ते कऱ्हाडच्या महामार्ग पोलिस चौकीत नेमणुकीस आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अनेक गुन्हे उघडकीस आणण्यातही शशिकांत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच खात्याअंतर्गत १२५ पारितोषिकेही त्यांनी मिळविली आहेत. सतरा पारितोषिकांबरोबरच ‘कऱ्हाड भूषण’ने सन्मानितपोलिस सेवेतील विशेष कामगिरीची दखल घेऊन खात्याअंतर्गत शंभरहून अधिक पारितोषिके शशिकांत खराडे यांनी पटकाविली आहेत. राज्य, राष्ट्रीय पातळीवर नेमबाजी स्पर्धेत त्यांनी १७ पारितोषिके पटकाविली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत माउली फाउंडेशनने २०१४-१५ चा ‘कऱ्हाड भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. पोलिस खात्याबरोबरच ग्रामीण भागात अनेक होतकरू खेळाडू आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी लागणारी साधने मात्र त्यांना उपलब्ध होत नाहीत. साधने नसल्यामुळे त्यांना सराव करता येत नाही. अशा ग्रामीण खेळाडूंना आवश्यक ती साधने उपलब्ध झाल्यास त्यांना यश मिळविणे सुकर होईल.- शशिकांत खराडे, कॉन्स्टेबल
लगोरीचा ‘नेमबाज’ पोहोचला राष्ट्रीय पातळीवर
By admin | Updated: March 25, 2016 23:34 IST