कोरेगाव : एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शहरातील शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये दोन हजार रुपयांच्या १९ बनावट नोटा जमा करणारा सागर शांताराम शिर्के (रा. बोबडेवाडी, ता. कोरेगाव) याला गुन्हा दाखल होताच तातडीने अटक करत पोलिसांनी दोन तासातच गुन्हा उघड केला. शिर्के याच्या बोबडेवाडी व मुंबईतील घरातून प्रिंटरसह अन्य साहित्य जप्त केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्टीयीकृत बँकेमध्ये बनावट नोटा भरण्याचा प्रयत्न झाल्याने शाखाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील व पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली. बँकेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक अमोल सपकाळ, धनंजय दळवी, अमोल कणसे, सनी आवटे, पूनम वाघ, अविनाश घाडगे यांच्या पथकाने बोबडेवाडी येथून सागर शिर्के याला अवघ्या काही मिनिटामध्ये ताब्यात घेतले.
त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व स्वत: राहत्या घरात संगणकाच्या साह्याने बनावट नोटा बनवत असल्याचे सांगितले. त्याला अटक केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक कदम यांचे पथक मुंबईला रवाना झाले. वरळी परिसरातील शिर्के याच्या घरातून प्रिंटरसह स्कॅनर व कोरे कागद जप्त करण्यात आले. निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस नाईक अमोल सपकाळ अधिक तपास करत आहेत.
(चौकट)
बँकेने तक्रार दाखल करताच... बिंग फुटले!
मशीनमध्ये नोटा भरण्याच्या प्रयत्नात बिंग फुटले
बँकेच्या मशीनमध्ये नोटांचा भरणा होतो का? हे पाहण्यासाठी त्याने स्वत:च्या खात्यावर ४० हजार रुपये भरण्यासाठी दोन हजारांच्या २० नोटा वापरल्या. मात्र, एक नोट परत आली. उर्वरित १९ नोटा मशीनमध्ये जमा झाल्या. बँकेने तक्रार दाखल करताच, शिर्के याचे बिंग फुटले.