साताऱ्यात कपातीचे संकट नाही : रोजगाराची शाश्वती मिळाल्याने कोविड केअर कामगारांमध्ये समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मार्च महिन्यापासून कोविड रुग्णसंख्येने ओलांडलेला दोन हजारांचा टप्पा आता पुन्हा हजारावर येऊन ठेपला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये काम कमी झाले. मात्र, विलगीकरण कक्ष सुरू केल्याने तिथे कामाचा ताण वाढू लागला आहे. परिणामी कोविड केअर सेंटरमध्ये जादा असणारे कर्मचारी विलगीकरण कक्षात घेतल्याने कोणावरही नोकर कपातीचे संकट आले नाही.
सातारा जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोविडचे आकडे चांगलेच वाढते राहिले. लॉकडाऊन, वीकेंड लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन यासारखे प्रयोग करूनही काही केल्या आकडे कमी होत नव्हते. गत सप्ताहापासून गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. त्यानंतर बाधितांच्या आकडेवारीचा आलेख कमी झालेला दिसू लागला.
कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी कोणीही तयार नसताना, जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी तयार झालेल्या कोरोना योध्द्यांना राज्यातील अनेक सेंटर्समधून कमी करण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात अद्याप तरी असे काही सुरू नसल्याने कामगार, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पॉइंटर :
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर्स : २६
या सेंटर्ससाठी घेतलेला कंत्राटी स्टाफ : ३७६
सध्या सुरू सेंटर्स : २६
बंद झालेली सेंटर्स : एकही नाही
एकूण रुग्ण : १ लाख ७५ हजार ७७८
बरे झालेले रुग्ण : १ लाख ५७ हजार ९४४
सेंटर्समध्ये सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १३ हजार ९०५
एकही कोविड सेंटर बंद नाही
सातारा जिल्ह्यात कोविडची लाट ओसरू लागली असली तरी, अद्याप एकही कोविड सेंटर बंद केल्याची नोंद शासनदरबारी नाही. कोविड सेंटरचा ताण कमी झाला असला तरी, विलगीकरणात येणाऱ्यांचा आकडा स्थिर असल्याने येथे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोट
१. कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केलेल्या सेंटरमध्ये काम करण्याच्या कल्पनेनेही काही जणांचा थरकाप उडत आहे. आम्ही न घाबरता तेव्हा काम करून रुग्णसेवा केली. घड्याळाकडे न बघता रुग्णसेवा केल्याचे फलित नोकरकपात, हे योग्य नाही. आम्हाला अद्याप तरी असा सांगावा आलेला नाही, म्हणून आम्ही तणावमुक्त वातावरणात काम करू शकतोय.
- कंत्राटी कर्मचारी
२. या सेवेत घेताना ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, असे आम्हाला सांगण्यात आले होते. दुसरी लाट ओसरली म्हणून कर्मचारी काढल्यानंतर तिसऱ्या लाटेचा सामना प्रशासन कसा करणार आहे? इथलं काम गेलं म्हणून आम्ही अन्यत्र काम शोधावं आणि तिथं स्थिरस्थावर होईपर्यंत पुन्हा इकडं बोलावलं, तर कर्मचाऱ्यांनी कसं यावं?
- कंत्राटी कर्मचारी
३. साताऱ्यात रुग्णांचा आकडा वाढत असताना प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित अशा दोन्ही प्रकारचे कर्मचारी घेण्यात आले. काही ठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने कर्मचारी कपात करण्यापेक्षा त्यांना विलगीकरण कक्षात सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका योग्य, स्वागतार्ह आणि मार्गदर्शक अशीच आहे.
- कंत्राटी डॉक्टर