फलटण : येथील दर्शन अनिल आसवानी या युवकाचे रविवार, दि. १० रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून अपहरण झाले. चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी फलटण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केले आहे.याबाबत माहिती अशी की, दर्शन अनिल आसवानी (वय २१, रा. दत्तनगरजवळ, भडकमकरनगर, फलटण) याचा केबल व्यवसाय आहे. तो रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वत:च्या मोटारसायकलवरून विश्रामगृहासमोरून घरी जात होता. त्याच्या मोटारसायकलला पांढऱ्या रंगाच्या कारने अडविले. या कारमधील चौघांनी दर्शनला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले. याबाबत रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलीस व दर्शनच्या पालकांना माहिती दिली. फलटण शहर पोलिसांनी चारही बाजूंनी नाकाबंदी केली असून, सर्वत्र शोध सुरू आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. या घटनेने फलटण शहरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
फलटणमधून तरुणाचे अपहरण
By admin | Updated: August 11, 2014 00:15 IST