सातारा : मे महिना निम्यावर आला आहे. लग्न तिथीचा हंगाम ऐन भरात असल्याने काहींच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातील महत्वाचा भाग म्हणजे नवरदेव-नवरीसाठी मुंडावळ्या खरेदी करणं. बाशिंगाचा जमाना काळाच्या पडद्याआड गेला आहे. नाजूक-नाजूक मोत्यांच्या मुंडावळ्यांनी बाशिंगाची जागा घेतलेली असतानाच साताऱ्याच्या बाजारपेठेत खंडेराया, बानूच्या मुंडावळ्यांनी छाप पाडली आहे.लग्न तारीख काही दिवस लांब असतानच नवरदेव-नवरीची खरेदी जोर धरू लागते. त्यातून वेगवेगळ्या विधीसाठी वेगवेगळा पोषाख, मेहंदी, नेलपेंन्ट, शूज-चप्पल, हातरुमालाच्या जादा जोड यांची आठवणीने खरेदी केली जाते. पण या सर्व यादीची सुरुवात होते फेटा, मळवट अन् मुंडावळ्यापासून. काही दशकांपूर्वी बाशिंग वापरण्याची पद्धत होती. कागदी बेगडापासून बनविलेले भलेमोठे बाशिंग कपाळावर बांधले जात होते. मात्र, त्यांचे वजन जास्त असल्याने ते सतत हलत, एका बाजूला कलत असत. त्यामुळे नवरदेव-नवरी हे बाशिंग सांभाळूनच बेजार होत असत. त्यातून लग्न उन्हाळ्यात असेल तर विचारूच नका. बदलत्या काळानुसार या बाशिंगाची जागा मुंडावळ्यांनी घेतली. मोत्यांच्या माळापासून बनविलेल्या या मुंडावळ्या हाताळणे खूपच सोपे आहे. मोत्यांच्या दोन पदरी माळा कपाळाला बांधायच्या, दोन्ही डोळ्यांच्या बाजूने हनुवटीपर्यंत ते लोंबत असते. अन् त्याला टोकाला गोंडा लावलेला असतो. त्याचे वजनही काहीच नसते.त्यामुळे या मुंडवळ्यांनाच सर्वाधिक पसंती असते. दूरचित्रवाहिनीवर सध्या ‘जय मल्हार’ ही पौराणिक मालिका गाजत आहे. या मालिकेतही गेल्या रविवारीच खंडेराया व बानाईचा विवाह सोहळा प्रक्षेपित झाला आहे. या लग्न सोहळ्यात खंडेराया आणि बानूने लांबच लांब मुंडवळ्या घातल्या होत्या. लग्नाचा हंगाम इनकॅश करण्यासाठी टपलेल्या बाजारपेठांनी मात्र हा क्षण अलगत टिपला आहे. दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले खंडेराय आणि बानूबाई यांची छायाचित्रे प्रसिद्ध केलेल्या या मुंडावळ्या खरेदीला वधू-वरांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. या मुंडावळ्या सातारा शहरातील खणआळीत दाखल झाल्या आहेत. त्या खरेदीसाठी खणआळीत गर्दी होऊ लागली आहे. या मुंडावळ्या नव वधू-वरांसाठी आकर्षण ठरत आहे. त्यामुळे याच्या खरेदीतही वाढ होत आहे. या मुंडावळ्यांना जिल्ह्यातुून मागणी होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)मोदी सूटची क्रेझ कायमलोकसभा निवडणुका गेल्या मे महिन्यात झाल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमातून घराघरात पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूटाची विशेष क्रेझ होती. ही के्रझ आजही कमी झालेली नाही. लग्न समारंभात यजमान पार्टी किंवा नवरदेव-नवरीचे जवळचे नातेवाईक वडील, भाऊ, जावई किंवा भावकीतील मंडळींना आजही मोदी सूट शिवला जातो. काही वेळेस सूटवर फेटाही बांधला जातो. त्यामुळे कितीही वऱ्हाडी आली असले तरी जवळचे नातेवाइक यामुळे उठून दिसत आहेत. तसेच लहान मुलांनाही या प्रकारचे कपडे शिवले जात आहेत. किंबहुना त्यांचाच तसा आग्रह असतो. त्यावरुन लग्न सोहळ्यावर सेलेब्रिटीजची क्रेझ कायम असल्याचे स्पष्ट होते.
साताऱ्याच्या बाजारपेठेत खंडेरायाच्या मुंडावळ्या
By admin | Updated: May 11, 2015 23:27 IST