कऱ्हाड : जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना राख्या बांधण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने हे अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या संगीता साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मनीषा साळुंखे, प्रांजली साळुंखे, दीपाली साळुंखे, दीपाली सुनील साळुंखे, मीना साळुंखे यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन विनोद कात्रे, संजय अडसूळ, विक्रम जाधव, सतीश पवार, सुजित साळुंखे, अविनाश फडतरे, गणेश शेजवळ उपस्थित होते.
शिवनगरला ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. सावंत यांच्या संकल्पनेतून शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यालयांमध्ये दहा ते अकरा गावांतील विद्यार्थी येत असतात. विद्यार्थी संख्याही जास्त राहाते. मात्र, कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दररोज शिक्षक विद्यालयात उपस्थित राहून ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करीत आहेत. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबीची असल्याने मुख्याध्यापक सावंत यांनी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी पाच ते सात विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना पाठ समजावून सांगणे, उजळणी घेणे, प्रश्नोत्तरे, चाचण्या, गृहपाठ देऊन ते तपासून घेतले जातात.
आदर्श प्राथमिक विद्यालयात राखी प्रदर्शन
कऱ्हाड : मलकापूर येथील मळाई देवी शिक्षणसंस्था संचलित आदर्श प्राथमिक विद्यालयात राखी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका ज्योती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. रक्षाबंधन सणासाठी आयोजित या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: राख्या बनवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जीवनातील रक्षाबंधनाचे महत्त्व त्यांना शिक्षकांनी सांगितले. प्रदर्शनाला सचिव अशोकराव थोरात, भास्करराव पाटील, वसंतराव चव्हाण, स्वाती थोरात, तुळशीराम शिर्के यांनी भेट दिली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी स्वाती थोरावडे, मनीषा माने, जयश्री तडाखे, शंकर काकडे यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय सेवा योजनेची बैठक उत्साहात
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. कोरोनाकाळात राष्ट्रीय सेवा योजनेवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यावेळी शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये यांनी केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. पाटील होते. यावेळी प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे, प्रा. वंदना किशोर, विद्या पाटील, योगेश कस्तुरे, रोहिणी शेळके, रमेश पोळ उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. तानाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अभय पाटील यांनी आभार मानले. कोमल कुरुंदकर यांनी सूत्रसंचालन केले.