मसूर : कवठे मसूर ता. कऱ्हाड श्री जोतिर्लिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक कार्यालय व शिक्षक खोलीचा दरवाजा अज्ञाताने उघडून आत प्रवेश करत शाळेतील दोन संगणक व त्यांचे साहित्यांची मोडतोड केली. इतर महत्त्वाची कागदपत्रे व ग्रंथालयाची पुस्तके, खुर्च्या व इतर किंमती वस्तू नासधूस करून मोडून शाळेच्या पटांगणात व समोरील ओढ्यात टाकून व शाळेच्या समोरील भिंती आॅईलपेंटच्या काळयारंगाने विद्रूप केल्या आहेत. यामध्ये सुमारे एक लाख दहा हजार रूपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवार दि. १६ च्या मध्यरात्री घडली. मसूर पोलीस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे. शाम-शरद प्रसारक संस्था कवठे संचलीत श्री जोतिर्लिंग विद्यालयाची नवीन इमारत मसूर कवठे रस्त्यावर आहे. याठिकाणी आठवी ते दहावीपर्यंतचे एकूण तीन वर्ग आहेत. सोमवार दि. १६ रोजी शाळा सुटल्यानंतर शिक्षक व कर्मचारी सर्वजण घरी गेले. याचदिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी शाळेतील दोन संगणक व त्यांचे साहित्य ओढ्यात व पटांगणात टाकून त्यांची मोडतोड केली. इतर महत्त्वाची कागदपत्रे व ग्रंथालयाची पुस्तके तसेच फोटो शाळेच्या इतर किमती वस्तू तोडून शाळेच्या पटांगणात व ओढयात टाकून दिले. विद्यालयाच्या प्रांगणात काही कागदपत्रे ओढ्यातील पाण्यात पडलेली होती. दोन्ही रूममधील कपाटाच्या काचा फोडल्या, स्वच्छतागृहाचे दरवाजे तोडून सर्व साहित्यांचे एक लाख दहा हजार रूपयांचे नुकसान झाले, अशी फिर्याद मुख्याद्यापक जे. एम. शिंंदे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. सातारा येथील श्वानपथक पाचारण केले होते. श्वानपथकाने तपसाच्यादृष्टीने सकारात्मक मार्ग दाखवला आहे. तसेच याठिकाणी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी केंद्रप्रमुख नसीमा मुलाणी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम दीक्षित यांनी भेट देऊन पहाणी केली. (वार्ताहर)
कवठे-मसूर शाळेवर अज्ञातांचा हल्ला
By admin | Updated: February 18, 2015 01:03 IST