विनोद पोळ / कवठे कोणतेही शुभकार्य असले की त्यात गावातील मान्यवरांचा सत्कार समारंभ घेतला जातो. सोहळा लग्नाचा पण विधी बाजूला ठेवून, वऱ्हाडी मंडळीला अक्षता हातात घेऊन ताटकळवत बसवून गावपुढाऱ्यांचा हारतुरे, नारळ देऊन सत्कार करण्याचे फॅड अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. आपल्या शुभकार्यात किती मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली याचा आनंद कार्यमालकाला होत असला तरी इतरांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. लग्नकार्यात सर्वांना मान मिळावा, यासाठी कवठे गावात ग्रामस्थांनी ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावची यात्रा संपल्यानंतर संपूर्ण वर्षभराच्या हिशोबाची बैठक घेतली जाते व हिशोब वाचनानंतर गावातील महत्त्वाच्या सामाजिक हिताच्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जे निर्णय घेण्यास ग्रामपंचायतीला अडचणीचे ठरू शकते, असे बहुतेक सर्व निर्णय गावबैठकीत घेतले जातात व ते गावास बंधनकारक असतात. यंदाच्या गावबैठकीत हिशोब वाचन झाल्यानंतर एका असाच क्रांतिकारक निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात आली. कोणाचेही लग्नकार्य असले की गावातील प्रत्येक संस्थेचे आजी, माजी पदाधिकारी यांचा नामोल्लेख करून त्यांना श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्याची परंपरा बहुतेक विवाहसोहळ्यात पाळतात. या विषयावर चर्चा होऊन लग्न समारंभात येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या समारंभातील महत्वाची आहे. सर्वांचाच सत्कार टाळला तर सर्वाना समान वागणूक मिळेल, असा गावबैठकीत निर्णय झाला. गावकारभाऱ्याची नेमणूक कवठे, ता. वाई हे राजकीय दृष्ट्या पुढारलेले गाव. येथे ग्रामपंचायत स्वतंत्र कारभार करते तर त्याला समांतर अशा पद्धतीने गावकारभार चालतो. भैरवनाथाच्या यात्रेपूर्वी दोन वर्षासाठी गावकारभाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण वर्षभर गावाचा कारभार चालविला जातो.
लग्नातील नेत्यांच्या सत्कारांना कवठेकरांनी दिला नारळ
By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST