पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर तृण, कंद, वेली, आर्किड तसेच विविधरंगी फुलांच्या हंगामास सुरुवात झाल्याने पर्यटकांची पावले कास पठाराकडे मोठ्या प्रमाणावर वळत असून, रविवारी हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली.
कास पठार, कास तलाव परिसरात आल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असून, शनिवार, रविवार तसेच सलग सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. सूर्यप्रकाशाचा अभाव व दाट धुक्याने फुलांचा बहर जेमतेम दिसत असला तरी गौरी-गणपती उत्सवानिमित्त जिल्हा, परजिल्हा, राज्यभरातून पर्यटक कासला भेट देत आहेत.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता, दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठाराची ओळख प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सध्या कास पठारावर कंदील पुष्प, ड्रॉसेरा, अबोलिमा, नीलिमा, गवेली, विघ्नहर्ता, रानमहुरी, टूथब्रश, रानहळद, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, आदी फुलांनी तुरळक स्वरूपात बहरली आहे. तेरडा, गेंद, सीतेची आसवे, आदी फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यांतून तसेच परदेशी पर्यटक कासच्या दर्शनास येताना दिसत आहेत.
जून ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल, रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलाचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. पठारावरील विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो.
सध्या पठारावरील कुमुदिनी तलावाच्या राजमार्गावर पांढऱ्या, लाल, जांभळ्या रंगाची अल्प छटा पर्यटकांना दिसण्यास सुरुवात झाली आहे. चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी, दाट धुके, पठारावरून कोसळणारा छोटा धबधबा यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत मनमुराद आनंद लुटत आहेत.
चौकट
पिवळ्या फुलांची झालर वेधतेय पर्यटकांचे लक्ष..
इवल्याशा बोटांनी फुलांना कॅमेराबंद करण्यासाठी चिमुरड्याला देखील मोह आवरत नसल्याने फोटो काढण्यात तो गुंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच गणेशखिंड परिसरात ठिकठिकाणी मिकी माऊसच्या पिवळ्या फुलांची झालर पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागली आहे.
(कोट)
गेल्या सात दिवसांपासून पठारावर पावसाची सतंतधार व दाट धुके दिवसभर पडत आहे. सध्या गेंद, सीतेची आसवे, तेरडा बहरत असून, येत्या काहीच दिवसांत गालिचे दिसण्यास सुरुवात होईल. सध्या सूर्यप्रकाशाचा अभाव तसेच दाट धुके दिवसभर पडत आहे. पठारावरील फुलांच्या अधिक बहरासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे.
-मारुती चिकणे, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती
(छाया - सागर चव्हाण)