कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त दिलेल्या निधीपैकी मंजूर निधीतून येथील प्रीतिसंगम बागेचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये बागेस प्रवेश कमान बसवणे, यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट दर्शविणारी भिंत बांधणे, परिसरातील मंदिराचे सुशोभीकरण, समाधी दुरुस्ती, सुरक्षा आदी कामे करण्यात येत आहे.कऱ्हाड शहराचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व वाढविणारा कृष्णा व कोयनेचा प्रीतिसंगम व या प्रीतिसंगमालगत कऱ्हाडचे नाव जगात सर्वदूर पोहोचवलेले यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ असून, हे ठिकाण उत्तम पर्यटनस्थळात गणले जावे, यासाठी यापूर्वी तेथे अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. पी.डी. पाटील यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ परिसरामध्ये १९४८ मध्ये बांधलेल्या या बागेला सुमारे ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. कृष्णा-कोयनेच्या पवित्र संगमावर असणारी ही बाग म्हणजे कऱ्हाडसह परिसराचे आकर्षण आहे. बागेत हवेशीर वातावरण असल्याने सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी नागरिक आवर्जुन येतात. तर याठिकाणी व्यायाम करण्यासाठी पहाटेपासून युवकांची गर्दी असते. याठिकाणी असणाऱ्या विविध खेळण्यांमुळे बालगोपाळांची गर्दी असते. उन्हाळी व दिवाळी सुटीत विशेष करून याठिकाणी गर्दी असते. तर शालेय सहलींसाठीही हे ठिकाण जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही ओळखीचे व आकर्षण केंद्र आहे. या बागेत असणारी खेळणी तुटलेली आहेत, स्मृतिस्थळाची भिंतही दुरुस्त करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)‘सीसीटीव्ही’सह आकर्षक रोषणाईसध्या या बागेच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून, सुमारे ३ कोटी खर्च करून बागेत सुविधा करण्यात येत आहेत. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, गवताचे लॉन, मातीचे लॉन, आकर्षक फुलझाडे, पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर, एलईडी बल्बद्वारे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
कऱ्हाडच्या प्रीतिसंगम बागेला मिळतेय झळाळी!
By admin | Updated: May 27, 2016 00:24 IST