कऱ्हाड व पाटण तालुक्यात मार्च महिन्यामध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. कऱ्हाड तालुक्यात तर मार्च महिन्यामध्ये तब्बल सहाशे रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी सुमारे अडीचशे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी सकाळच्या अहवालात शहरात सोमवार पेठेत १, मंगळवार पेठ १, इतर तीन, तर तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरे १, मुंढे १, काले १, पार्ले २, शेणोली १, विद्यानगर १, मसूर २, सैदापूर १, कार्वे १, तारुख १, आगाशिवनगर येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून बाधितांच्या निकट सहवासीतांचा शोध घेतला जात असून, त्यांची तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे.
पाटण तालुक्यातील रुग्णसंख्या अद्याप वाढली नसली तरी कोरोना संक्रमणाचा धोका कायम आहे. दररोज दहा ते पंधरा रुग्ण तालुक्यात आढळून येत आहेत. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात संक्रमण होत असल्याने चिंता वाढत आहे. बुधवारच्या अहवालात पाटण शहरात एक, तर ग्रामीण भागात ढेबेवाडी येथे २, वजरोशी १, निसरे १, तारळे २, सडावा घापूर १ आणि कोंजवडेत १ रुग्ण आढळून आला आहे.