कऱ्हाड : येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्ताने गत वर्षभर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून टिळक हायस्कूलच्या २००२-२००३ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळातील महत्त्वाची गरज आणि यामागे असलेला सामाजिक कृतज्ञतेचा भाव म्हणून या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. येथील लाहोटी कन्या प्रशालेत सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सुमारे २५ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव राजेंद्र लाटकर, उपाध्यक्ष शिल्पा वाळिंबे, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक गोकुळ अहिरे, लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांच्यासह शताब्दी महोत्सव समितीचे रत्नाकर शानभाग, विद्याधर कुलकर्णी, श्रीधर घळसासी, दिलीप इनामदार, मुकुंद काकडे, दीपक पाटील, रुपेश कुंभार आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक ढापरे आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले.