सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे काळवंडल्यासारखी दिसत असून उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ढेबेवाडी परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. त्यावरच शेतकरी कुटुंबांचे वर्षभराचे धान्य नियोजन अवलंबून असते. अलीकडे पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने शेतकऱ्यांचे खरिपातील ज्वारीचे गणित फसत आहे. ऐन काढणीच्या काळातच पावसात सापडल्याने पीक हातचे गेल्याचा अनुभव वारंवार येत असल्याने आता बहुतेक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीवरच भिस्त ठेवली आहे. थंडीच्या दिवसात अल्प पाण्यावर साधणाऱ्या रब्बी ज्वारीचे क्षेत्रही या परिसरात मोठे असून रानडुकरांकडून काही प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा अपवाद वगळता उत्पादनही चांगले मिळत आहे.
यंदा चांगले पाऊसमान व पोषक हवामान यामुळे चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची ज्वारीवरील काणी रोगाच्या प्रादुभार्वामुळे झोप उडाली आहे. या रोगात बुरशी संक्रमणामुळे कणीसावर काळपटपणा दिसतो. ज्वारी फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस किंवा धुक्यामुळे त्यावर रोगाचा फैलाव होतो, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सांगितले.
‘पेरणीपूर्वी गंधकाची पाच ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास हा रोग टाळता येतो. पीक फुलोऱ्यात असताना कॅप्टन किंवा मॅनकोझेब तीन ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणेही उपयुक्त ठरते. पिकाची फेरपालट करावी. हलक्या जमिनीवर रब्बी ज्वारीची पेरणी करताना रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे काढून नष्ट करावीत. म्हणजे पुढे रोगाचा प्रसार होणार नाही’, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सुचविले आहे.
सध्या ढेबेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी काणीचा फैलाव झाल्याचे दिसून येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांना अद्यापही यश आलेले नाही.
- कोट
यंदा ज्वारीचे पीक चांगले साधेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, काणीच्या प्रादुर्भावामुळे जादा उत्पन्नाची शाश्वती वाटत नाही. बहुतेक शिवारातील ज्वारीची कणसे काळी पडलेली आहेत. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.
- दिलीपराव पाटील, शेतकरी
- चौकट
वन्यप्राण्यांचा उपद्रवही वाढला
ढेबेवाडी खोऱ्यात बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेतात. येथील शेतजमीन मुरमाड आहे. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. रब्बी हंगामातील वातावरण येथे पोषक असते. त्यामुळे या हंगामात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र लागवडीखाली असते. सध्या रब्बी पिके जोमात आली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांकडून या पिकांचे नुकसान केले जात आहे. प्राण्यांच्या उपद्रवामुळेही शेतकरी हतबल झाले आहेत.
फोटो : ०१केआरडी०५
कॅप्शन : ढेबेवाडी विभागात ज्वारीवर काणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक काळवंडले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.