सातारा : केंद्रासह राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपने मिळविलेल्या देदिप्यमान यशानंतर साताऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र, आनंद गटातटाने साजरा केला जात असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात जागोजागी पाहायला मिळत आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून राज्यात सत्ता मिळविली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. निवडणूक निकालापासून सातारा शहरात जागोजागी फलकयुध्द सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला आणि या फलकांमध्ये आणखी वाढ झाली. पोवईनाका, राजवाडा, मोती चौक अशा मोक्याच्या स्थळांवर भाजपचे मोठाले फलक झळकले आहेत. मात्र, या फलकांवरुन पक्षातील गटबाजी समोर आली आहे. भाजपचे जिल्हयातील पदाधिकारी आनंदही एकत्र येवून साजरा करत नसल्याने पक्षाची ताकद जिल्हयातील ताकद कशी वाढणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.कोल्हापूरचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची साताऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी विशेष जवळीक आहे. भाजपचे प्रवक्ते विजयकुमार काटवटे, रवींद्र पवार यांची छायाचित्रे असणारे फलक गोल मारुती मंदिर व राजवाड्यावर पाहायला मिळतात. तर त्याच्याच बाजूला जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, महिला अध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांची छायाचित्रे असणारे फलक पाहायला मिळतात. तिकिट वाटपात देवेंद्र फडणवीस यांची मर्जी मिळवणारे दीपक पवार यांचे जाहिरात फलकही पोवईनाका परिसरात पाहायला मिळतात. एकाच पक्षात तीन गट पडल्याचे सध्याचे चित्र आहे. मोठ्या कार्यक्रमाला हे सर्व जण एकत्र येतात. मात्र, आनंद व्यक्त करताना गटातटाने करतात, असे चित्र आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच हा प्रकार होता. सुरुवातीला दत्ताजी थोरात व सुवर्णा पाटील यांच्यात तिकिट वाटपावरुन स्पर्धा होती. तिकिट वाटप करताना या दोन्ही निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने दाखल झालेल्या दीपक पवारांना तिकिट दिले. त्यानंतर थोरात व पाटील यांचे गट एकत्र आले. (प्रतिनिधी)लौकिकासोबत बळही वाढावे...केंद्रातील सत्तेनंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिध्द झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही या पक्षाने चांगलाच शिरकाव केला. साताऱ्यात मात्र कुठेही कमळ फुललेले पाहायला मिळाले नाही. अद्यापही जिल्ह्यात तोकडी ताकद घेऊन भाजप उभा आहे. काही शहरांमध्ये तर अस्तित्वापुरता असलेल्या या पक्षाने संघटना बांधणीचे काम करणे आवश्यक असताना आहे तेच पदाधिकारी एकमेकांना पाण्यात बघू लागले तर बळही गेले आणि हाता तोंडाशी आलेला घासही गेला, असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. भाजपच्या फ्लेक्सची गर्दी वाढतच चाललीय..कऱ्हाड : देशात ‘नरेंद्र’ अन् राज्यात ‘देवेंद्र’ सरकार आल्याने जिल्ह्यात एकही भाजप आमदार नसतानाही कार्यकर्त्यांचा विश्वास मात्र दुणावल्याचे चित्र आहे. साहजिकच, काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कऱ्हाडात आता भाजपच्या फ्लेक्सची गर्दी वाढलेली दिसतेय ! एक दिलाने काम केल्यास ‘कमळ’ रूजायला अडचण येईल, असे वाटत नाही. कऱ्हाड हे दिवंगत यशवंतरा चव्हाण यांचे गाव ! साहजिकच या गावाने, तालुक्याने आजवर काँग्रेस विचारसरणी जोपासली. तरीही शिवसेना-भाजपसारख्या पक्षांनीही येथे पाय ठेवायचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना तितकेसे यश आल्याचे दिसले नाही; पण त्यांची चिकाटी मात्र कायम आहे. भाजपचेच बोलायचे म्हटले तर ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, विद्यमान जिल्हाध्यक्ष भरत पाटील आदींची पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न ठेवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंच्या हातात भाजपने कमळ दिले. त्यात यशाप्रत पोहचता आले नसले तरी कमळाच्या चिन्हाला कऱ्हाड दक्षिणेत आजवरच्या इतीहासात पडलेली ती सर्वात जास्त अन् विचार करायला लावणारी मते आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना साहजिकच बळ मिळाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाड शहर व तालुक्यात यंदा प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक मोठ्या संख्येने लागल्याचे पहायला मिळताहेत. त्यामुळे लोकांच्यात त्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)एकवाक्यतेचा अभावभाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपली छबी असणारे फ्लेक्स लावले आहेत खरे; पण प्रत्येकाने स्वतंत्रपणे फ्लेक्स लावल्याने त्यात एकवाक्यता दिसत नाही. त्याचीही चर्चा सुरू आहे.
‘कमळा’चा आनंद पाकळ््यांमध्ये विखुरला !
By admin | Updated: November 5, 2014 00:08 IST