सातारा : ‘पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्येही या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि कालबाह्य न होण्यासाठी कोणताही एक विषय किंवा क्षेत्रात अभ्यास करून पत्रकारांनी स्वत:ची ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार अभिजित घोरपडे यांनी व्यक्त केले.पत्रकार दिनानिमित्त सातारा पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्ष दिनाज शेख, नगरसेविका मनीषा भणगे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी अध्यक्ष शरद काटकर, खजिनदार राहुल तपासे, कार्यकारिणी सदस्य विठ्ठल हेंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. घोरपडे म्हणाले, ‘पत्रकारिता या क्षेत्रात विविध प्रकार रुजू लागल्याने हे क्षेत्र चिंतेच्या वातावरणात आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळाप्रमाणे आपण बदलत राहिले पाहिजे. ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्याचा स्वीकार केला पाहिजे. ’यावेळी पत्रकार संजय पिसाळ यांच्या कुटुंबी यांना कार्यक्रमाच्या उपस्थितांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. विनोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी वर्षभरात पुरस्कार मिळविलेल्या उल्लेखनीय काम केलेल्या सातारा शहरातील प्रवीण शिंगटे, मोहन पाटील, उमेश भांबरे, शशिकांत कणसे व महेंद्र जाधव या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. दीपक दीक्षित यांनी सूत्रसंचलन केले. राहुल तपासे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मोजकीच माहिती देणारा चांगला पत्रकार!गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात भरपूर बदल झाले आहे. या बदलाचा परिणाम पत्रकारांवर पडत आहे. त्याच्या परिणामांचा फायदा आणि तोटाही सोसावा लागत आहे. पत्रकारांचे स्थान घसरू लागल्याने पत्रकारांबद्दलचा दृष्टिकोन कलुषित झाला आहे. पत्रकारांनी झालेल्या बदलांचा अभ्यास करून बदल करावा. आता मोजकीच आणि महत्त्वाची माहिती घेऊन बातमी करणारा चांगला पत्रकार मानला जात आहे.
पत्रकारांनी ओळख निर्माण करावी
By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST