सागर गुजर - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनेकांनी नशीब आजमवायचा प्रयत्न सुरू केला आहे. राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी काहीचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यातील कोपर्डेचे विद्यमान संचालक रवींद्र कदम व त्यांच्या पत्नी जयश्री कदम तसेच साखरवाडीतील रामराजेंचे विश्वासू ज्ञानेश्वर पवार व त्यांच्या पत्नी कौसल्या पवार ही दोन दाम्पत्ये जोडीनं रिंगणात उतरली आहेत.रवींद्र कदम यांनी मागील निवडणूक आर्थिक दुर्बल प्रवर्गातून लढवून ते विजयी झाले होते. बँकेच्या उपाध्यक्षपदापर्यंतही ते पोहोचले होते. मात्र, आर्थिक दुर्बल प्रवर्ग हा मतदारसंघच रद्द झाल्याने ते अडचणीत आले होते. या निवडणुकीत त्यांनी खरेदीविक्री व कृषी प्रक्रिया मतदार संघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ‘खरेदी विक्री’ मध्ये विद्यमान अध्यक्ष व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, विश्वासराव निंबाळकर यांचे तर ‘कृषी प्रक्रिया’त त्यांचे सहकारी आमदार बाळासाहेब पाटील व दादाराजे खर्डेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल असल्याने कदम यांची कोंडी झाली आहे. रवींद्र कदम हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय असल्याने पती-पत्नीपैकी एकाला संचालक पदावर संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्नी जयश्री कदम यांनाही महिला राखीव मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी मागे घ्यावी लागली तरी एका जागी अस्तित्व शाबूत राहू शकते, असा त्यांचा कयास आहे. ज्योतिर्लिंग फळे, फुले प्रक्रिया संघाच्या संचालिका असणाऱ्या जयश्री कदम यांच्याविरोधात तीस महिलांचे अर्ज आहेत. दरम्यान, रामराजेंचे विश्वासू तसेच महानंद दूध संघ, मुंबईचे संचालक ज्ञानेश्वर ऊर्फ डी. के. पवार यांनी खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात गृहनिर्माण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या पत्नी महानंद दूध संघाच्या माजी संचालिका व साखरवाडीच्या माजी सरपंच कौसल्या पवार यांनी महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही उमेदवारीवरून मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ‘राजेसंघर्षा’मुळेच हे दोन्ही अर्ज दाखल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन राजेंमधला संघर्ष थंडावला असल्याचे वातावरण दिसत असले तरी शीतयुद्ध थांबलेले नाही. ते पेटण्याआधी वातावरण शांत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. ...मागे बाळासाहेब आता डी. के. पवार बँकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून गृहनिर्माण मतदारसंघातून आ. बाळासाहेब पाटील यांनी उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविली होती. यात पाटील पराभूत झाले होते. आता त्यांच्या जागी फलटणचे ज्ञानेश्वर पवार उदयनराजेंचा सामना करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे काय होते, हे येणाऱ्या काळात पुढे येणार आहे.कदमांपुढे संघर्ष अटळबँकेचे विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र कदम यांनी कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून आणखी एक अर्ज दाखल केला असला तरी या मतदारसंघात आ. बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजेंचे विश्वासू राजू भोसले, विद्यमान संचालक दादाराजे खर्डेकर यांचेही अर्ज असल्याने याठिकाणी मोठा राजकीय संघर्ष होणार आहे.
निवडणूक रिंगणात ‘जोडी तुझी-माझी’
By admin | Updated: April 15, 2015 23:54 IST