शिरवळ : बेरोजगारीमुळे अनेकांना एकवेळचे जेवण मिळत नसल्याने उपासमार होत आहे, तर दुसरीकडे निगरघट्ट स्वस्त धान्य दुकानदार सरकारी धान्याचा काळाबाजार करत आहे. असाच प्रकार भोरच्या महसूल अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून उघडकीस आणला. स्वस्त धान्य दुकानदारासह काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. याप्रकरणी दुकानदारासह पिकअपचालकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, नसरापूर परिसरातील रेशनिंग दुकानदारांकडून धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेत असताना भोर पुरवठा अधिकारी यांनी पाठलाग करून शिरवळ पोलिसांच्या मदतीने पकडले. राजगड पोलीस ठाण्यात याबाबत विक्री करणारा व खरेदी करणारा या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. १९ पोती धान्यांसह पिकअप जीप जप्त केली आहे. याप्रकरणी तुषार सुभाष कानडे (वय ३७, रा. शिरगाव ता. वाई) असे रेशनिंग धान्याचा काळाबाजार खरेदी करणाऱ्या पिकअपचालकाचे नाव आहे. तुषार कानडे याने जीप (क्र. एमएच १२ एफजे ४९३७) या वाहनातून नसरापूर येथील कुणाल भरत हाडके यांच्याकडून तसेच इतर दुकानातून तसेच सोनवडी, पारवडी परिसरातील तांदूळ आणि गहू बेकायदेशीररीत्या काळ्या बाजाराने खरेदी करून सातारा बाजूला जात असल्याची माहिती शिरवळ पोलीस आणि भोर पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी महामार्गावर सापळा रचत शिरवळ हद्दीमध्ये वाहन पकडले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता दिशाभूल करण्यासाठी साखरेच्या पोत्यांमध्ये रेशनिंगचे गहू व तांदूळ भरलेले असल्याचे निदर्शनास आले. शिरवळ पोलिसांनी मुद्देमालासह राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी चालक कानडे व कुणाल हाडके यांना राजगड पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडी संपल्यानंतर भोर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच जामिनावर मुक्तता केली.