सातारा : महिलेच्या विनयभंगप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना न्यायालयाने गुरुवार (दि. १२)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले.सुमारे दीड महिन्यापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘आयटी अॅक्ट’चा गुन्हा दाखल झाला आहे. आ. गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा दिवसांची मुदत देण्यात आली. उच्च न्यायालयामध्ये दोनवेळा सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर तिसऱ्या सुनावणीवेळी सोमवारी उच्च न्यायालयानेही आमदार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आमदार गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी आमदार गोरे स्वत:हून शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. सुमारे तासभर पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. या ठिकाणी त्यांची सुमारे दीड तास वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दुपारी सव्वादोनला त्यांना जिल्हा न्यायालयात पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. सरकारी पक्ष आणि आमदार गोरे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गोरे यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)गोरेंचा चेहरा निर्विकार!आमदार जयकुमार गोरे न्यायालयात आल्यानंतर त्यांचा चेहरा गंभीर बनला. वकील न्यायालयापुढे म्हणणे मांडताना ते एकटक लक्ष देऊन ऐकत होते. सुमारे अर्ध्या तासानंतर न्यायाधीशांनी गोरेंना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देत असल्याचे जाहीर केले. यावेळी गोरे यांचा चेहरा निर्विकार दिसत होता.कार्यकर्त्यांची कसरत!आमदार गोरे हे सकाळी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. त्यांना सिव्हिलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यापाठोपाठ कार्यकर्त्यांच्याही गाड्या धावत होत्या. हीच परिस्थिती न्यायालयातही होती. त्यामुळे पोलिसांनी गोरे यांच्या चहू बाजूंनी कडे केले होते. तितकेच साध्या वेशातही पोलिस तैनात करण्यात आले होते.गोरे यांच्या वकिलांचे म्हणणे आमदार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘रोज पोलिस ठाण्यात हजेरी हवी आहे का?’ असे न्यायालयाने पोलिसांना विचारले होते. तेव्हा पोलिसांनी ‘काही गरज नाही. वाटेल तेव्हा फोनवरून बोलावून घेऊ,’ असे सांगितले होते. तपास आता उरलेला नाही. त्यामुळे पोलिस कोठडीची आवश्यकता वाटत नाही.पोलिसांनी का मागितली कोठडी?ज्या मोबाईलवरून एसएमएस पाठविले, तो मोबाईल जप्त करायचा आहे.दोन मोबाईल असून, त्यातील सीमकार्ड जप्त करायचे आहे.हा सर्व तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी द्यावी.
जयकुमार गोरे पोलिस कोठडीत
By admin | Updated: January 10, 2017 22:51 IST