पळशी : उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जाशी (ता. माण) येथील लान्स नायक चंद्रकांत शंकर गलंडे यांच्या पार्थिवाची ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. चंद्रकांत हे शहीद झाल्याचे समजल्यावर गावावर शोककळा पसरली आहे.चंद्रकांत गलंडे हे सर्वसामान्य कुटुंबातून सैन्यात भरती झाले होते. त्यांचे वडील शेती करतात. घरच्या परिस्थितीमुळे चंद्रकांत यांचा मोठा भाऊ मंज्याबापू आणि लहान भाऊ केशव देखील लष्करात भरती झाले. चंद्रकांत यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. चंद्रकांत हे हुतात्मा झाल्याचे समजल्यावर तहसीलदार सुरेखा माने यांनी जाशीला भेट देऊन गलंडे कुटुंबीयांचे सांन्तवन केले. यावेळी तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. चंद्रकांत यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी जाशी या गावी आणले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पार्थिव आणले जाणार असलेल्या मार्गातील रस्त्याकडेच्या झाडी प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने काढले असून, रस्त्याची साफसफाई केली आहे. अंत्यसंस्कार करणार असलेल्या ठिकाणाची स्वच्छता केली आहे. (वार्ताहर)
जाशी ग्रामस्थांना चंद्रकांत गलंडे यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा
By admin | Updated: September 20, 2016 00:03 IST