कऱ्हाड : ‘केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारतातील सराफ व्यावसायिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर नवीन कर लावले आहेत. अर्थमंत्री जेटली यांनी एक प्रकारचे उफराट्या कायद्याचे धोरण मांडले आहे,’ असा आरोप राज्य सराफ महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष साखरियॉ यांनी केला. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकारपरिषदेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुरसाळे, भाजप युवा मोर्चाचे विष्णू पाटसकर, शुभम पाल आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी, कर्मचारी व सराफ व्यावसायिक उपस्थित होते.साखरियॉ म्हणाले, ‘नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील सराफांच्या धोरणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया सराफ संघटनेने तीन दिवसांचा लक्षणिय बंद पुकारलेला आहे. त्यास शहरातील कऱ्हाड सराफ-सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने तीन दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारत आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सराफ व सुवर्णकार व्यापाऱ्यांवर भारतात तीस वर्षांनंतर प्रथमच अबकारी कर एक टक्का प्रस्तावित केला आहे. दोन लाखांच्यावर खरेदी करणाऱ्या दागिन्यांवर ग्राहकाने स्वत:ची ओळख सराफांना देण्यास बंधनकारक केले आहे. प्रस्तावित करात प्रति महिना १२ लाख रुपयांपर्यंत ज्यांचे व्यवहार असतील त्यांनी अबकारी खात्याकडे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया अत्यंत जाचदायक आहे. नोंदणीनंतर अबकारी खात्याला अमर्याद असे अधिकार बहाल होणार आहेत. सराफांवर अवलंबून असलेले सुवर्णकार व गलई कामगार यांची भारतात ४० लाख इतकी संख्या असून, त्यांच्यात प्रचंड बेरोजगारी पसरण्याचे काम या करामुळे होणार आहे. दोन लाखांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सराफाने नि:शुल्क, ग्राहकांची माहिती गोळा करून सरकारला द्यावी, असे आदेशाद्वारे नमूद केले आहे. त्यात चूक झाल्यास सरांफांना शिक्षा, दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. याबाबत पुणे येथे शुक्रवारी राज्य सराफ संघटनेची बैठक होणार असून, त्यात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष साखरियॉ यांनी दिली. तसेच भाजप हे व्यापार विरोधी सरकार आहे. त्यामुळे भारतातील सराफ व्यावसायिकांना व कर्मचाऱ्यांना मोठा तोटा होणार आहे. त्याचा निषेध म्हणून भारतातील सराफांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यास कऱ्हाडमधीलही सराफ असोसिएशनच्या वतीने सहभाग घेतला असून, शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जेटलींचे सराफांविरोधी धोरण उफराटे: साखरियॉ
By admin | Updated: March 4, 2016 00:58 IST