कऱ्हाड : ‘अण्णा भाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांनी त्याग केला. त्या त्यागाची फळे आम्ही आज चाखत आहोत. पण महात्म्यांच्या नावावरच आम्ही जगत आहोत, हे किती दिवस चालणार? आम्ही पुढच्या पिढीसाठी काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. रवींद्र पवार यांनी केले.
कऱ्हाड येथे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त दलित महासंघाच्यावतीने आयोजित गुणगौरव कार्यक्रमात ॲड. पवार बोलत होते. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे अध्यक्षस्थानी होते. समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. पवार म्हणाले, ‘वेदना भोगल्याशिवाय त्या कळत नाहीत. त्याशिवाय क्रांतीही होत नाही. जुन्या काळात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. सावली पडली तरी चालत नव्हती. आज परिस्थिती बदलत चालली आहे. त्या तुलनेने आज काहीच त्रास नाही. मग तुम्ही स्वतःला दलित का म्हणून घेता? कारण शोधत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.’
प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, ‘दलित म्हणवून घ्यायची आम्हाला काही हौस नाही; पण जातीचे विष जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत दलितत्व राहणारच आहे. खरं तर आम्हाला ते नाकारायचे आहे. पण अलीकडच्या काही महिन्यातील घटना जरी पाहिल्या तर आजही दलितांवरील अन्याय, अत्याचार सुरूच असल्याचे दिसते. त्यामुळे या साऱ्यापासून बाहेर कसे पडायचे, हा दलित समाजासमोर प्रश्नच आहे.’
यावेळी कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. रणजित पाटील, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर, शालन वाघमारे आदींना उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ''सत्यशोधक अण्णा भाऊ साठे समता पुरस्कार'' देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
यावेळी कऱ्हाड शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, प्रकाश वायदंडे, राम दाभाडे, हरिभाऊ बल्लाळ, मारुती काटरे यांची मनोगते झाली. प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. रमेश सातपुते यांनी आभार मानले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
मराठा समाज तडफडतोय
आज मागासवर्गीयपण दूर झाले पाहिजे, असे बोलले जाते. त्यासाठी काही प्रमाणात प्रयत्नही सुरू आहेत. ते दूर झाले पाहिजे म्हणून एकीकडे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला मराठा समाज मात्र आम्हाला मागासवर्गीय करा म्हणून रस्त्यावर उतरतोय. जर मराठा समाज मागासवर्गीय होण्यासाठी तडफडतोय, तर मग दलितांचे मागासपण कसे संपणार? असेही डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.
फोटो
फोटो ओळ
कऱ्हाड येथे दलित महासंघाच्या कार्यक्रमात मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.