वाठार निंबाळकर : मीरगाव गावाजवळील धोकादायक वळणावर यापूर्वी अपघात होत होते म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने सर्वेक्षण करुन नवीन पुलाचे बांधकाम केले. परंतु, हा पूलसुद्धा धोकादायक बनल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
मीरगाव येथे नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. फलटण - सातारा रस्त्यावर मिरगाव येथे ओढ्यावरील पूल अरुंद व इंग्रजी एस आकाराचा असल्याने याठिकाणी सतत अपघात होत होते. त्यामुळे ग्रामस्थ व वाहनचालकांच्या मागणीनुसार याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. मात्र, पूल झाल्यापासून त्या पुलावरसुद्धा अपघातांची संख्या वाढली आहे. पूल तयार होऊन वर्ष झाले तरी रस्ता दुभाजक टाकले नाहीत. दिशादर्शक चिन्ह नाही. जुन्या धोकादायक वळणापेक्षा नवीन तयार करण्यात आलेल्या पुलाचे वळण त्याहीपेक्षा धोकादायक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने काम करताना व्यवस्थित वळण काढले नाही. त्यामुळे वळणावर समोरासमोर येणारी वाहने दिसतच नाहीत. अचानक वळण घ्यावे लागत आहेत. अवजड वाहनांना पटकन वळण घेता येत नाही. साध्या हलक्या वाहनांनासुद्धा त्रास होत आहे. परिसरातील लोकांचे येणे-जाणेसुद्धा यामुळे जीवघेणे झाले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी गावकरी व समता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.