लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतील अनियमितता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने राज्यात ३० एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध घेण्यासाठी तब्बल २५ कोटी शिधापत्रिकांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात बोगस कार्डधारकांचे पितळ उघड होणार आहे. बोगस कार्डधारक व एजंटांनी घेतली धास्ती.
राज्य शासनाकडून बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या वर्गवारीमध्ये राज्यात तब्बल २४ कोटी ४१ हजार ७६४ शिधापत्रिका वितरित केल्या आहेत. या सर्वच शिधापत्रिकांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार असून, त्यासाठी शासकीय कर्मचारी, तलाठी यांची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे तपासणीअंती शिधापत्रिकांची दोन गटांत विभागणी केली जाईल. यामध्ये छाननीनंतर पुरेसा पुरवा असलेल्यांची यादी गट -अ म्हणून केली जाईल. गट - ब मध्ये पुरेसा पुरावा न देणाऱ्यांची नोंद घेतली जाणार आहे. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या शोधमोहिमेत केंद्र शासनाकडून प्राप्त प्रत्येक निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा २८ जानेवारी रोजी राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बोगस कार्डधारकांचे धाबे दणाणले असून, कार्ड बंद करण्यासाठी एंजटांच्या मागे तगादा लावला आहे.
खटाव तालुक्यातील योजनानिहाय कार्ड संख्या ६९ हजार ८७, तर लाभार्थी संख्या २ लाख ५४ हजार ५०६ इतकी आहे. यामघ्ये अंत्योदय योजनेत २ हजार ८४३, तर ११ हजार ३२० लाभार्थी संख्या आहे. प्राधान्य कुटुंब गटामध्ये समावेश असलेली कार्ड संख्या ४४ हजार ५८५ आहे, तर लाभार्थी संख्या १ लाख ७३ हजार ७६४ इतकी आहे. प्राधान्य कुटुंबमध्ये समाविष्ट नसलेली कार्ड संख्या १७ हजार ८६६, तर यामधील लाभार्थी संख्या ६६ हजार ५६६ इतकी आहे. शुभ्र कार्ड संख्या ३ हजार ७९३, तर लाभार्थी संख्या ९ हजार ६६५ इतकी आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात किती शिधापत्रिका अपात्र होणार याकडे सर्वसामान्यांचे व खऱ्या लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
___
चौकट ...
शासकीय कर्मचाऱ्याची व तलाठ्यांची मदत!
अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची व तलाठ्यांची मदत घेतली जाईल. विहित नमुन्यातील अर्ज भरून दिल्यानंतर रहिवासी पुरावा म्हणून सादर केलेला दस्तऐवज एक वर्षापेक्षा जास्त जुना नसावा.
____
चौकट ..
तपासणीत पोलासांचाही सहभाग
राज्यात एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली गेली नसल्याची खातरजमा या मोहिमेंतर्गत घेतली जाणार आहे. त्याचवेळी संशयास्पद वाटणाऱ्या पुराव्याबाबत पोलीस तपासणीचेही निर्देश राज्य शासनाकडून घेण्यात आले आहेत.
----------------------
फोटो ..
केशरी शिधापत्रिका संग्रहित फोटो वापरणे.