सातारा : ‘इंकाची देवराई’ हे प्रवासवर्णन वाचकांच्या मनातील कुतूहल शमविण्याचा बराचसा प्रयत्न करते. हे पुस्तक म्हणजे वाचकांना प्रगल्भ करणारा अनुभव असेल यात शंका नाही, असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले.
डॉ. संदीप श्रोत्री लिखित ‘इंकाची देवराई’ या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. दिलीपराव माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, मराठी साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, अशोकराव वाळिंबे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. शंतनू अभ्यंकर, वासुदेव कुलकर्णी आदींनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग नोंदविला.
डॉ. संदीप श्रोत्री यांनी पेरू देशातील इंका या विस्मयकारक आणि गूढ अशा संस्कृतीच्या केलेल्या भटकंतीचं चित्रदर्शी प्रवासवर्णन करणारी ‘इंकाची देवराई’ ही एक प्रवासवर्णनमाला आहे. या प्रवासवर्णन मालेतील हे तिसरे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘कासवाचे बेट’ आणि ‘मनूचे अरण्य’ या दोन पुस्तकांचे रसिकांनी भरभरून स्वागत केले. या दोन्ही पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
इंका संस्कृतीचं पाषाणाचं रथचक्र कसं उध्दारलं गेलं, याविषयीची मनोरंजक माहिती या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना मिळेल, अशी माहिती इंका संस्कृतीचे अभ्यासक जुवान कार्लोस यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा जोग यांनी केले. तांत्रिक बाबी केतके गद्रे यांनी सांभाळल्या.
फोटो : २३ संदीप श्रोत्री
डॉ. संदीप श्रोत्री लिखित ‘इंकाची देवराई’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डावीकडून शिरीष चिटणीस, अशाेक वाळिंबे, दिलीपराव माजगावकर व डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते.