फलटण : फलटण तालुक्यामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदार, व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य आहे. रविवार(दि.२१)पर्यंत दुकानदार व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी न केल्यास त्यांना दुकाने तसेच व्यवसाय सुरू ठेवता येणार नाही,’ असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिला.
फलटण तालुक्यामध्ये पूर्णत: लॉकडाऊन नसल्याने व बहुतांशी दुकाने व व्यावसायिक आस्थापना सुरू आहेत. त्या ठिकाणी अनेक नागरिकांची ये-जा सुरू आहे. दुकानदार अथवा व्यावसायिक आस्थापनेवरील व्यक्ती / कामगार यांचा प्रत्येक दिवशी अनेक ग्राहकांशी संपर्क येत असल्याने कोविड प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य असल्याचे आदेश देण्यात येत आहे. २१ मार्चपूर्वी संबंधितांनी कोविड चाचणी करून न घेतल्यास संबंधित दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.