सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात दरड कोसळली तर गेल्या २४ तासांत कोयना धरणातील पाणी पातळीत २ टीएमसीने वाढ झाली आहे. महाबळेश्वरला वेण्णा लेकमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. सातारा शहरात मोळाचा ओढा परिसरात झाड उन्मळून पडल्याने पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरणातील पाणीपातळी तब्बल ६ फुटांने वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात २ टीएमसीची वाढ झाली आहे. सध्या धरणातील साठा १४.३६ टीएमसी झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाचपर्यंतच्या नऊ तासांत कोयना येथे ३२ मिमी (५९२) पाऊस झाला. तर नवजा ४५ (७७८) आणि महाबळेश्वर ६७ (६७४) मिमी पाऊस झाला. शुक्रवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दाणादाण उडाली असून, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची घटना घडली आहे. कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी दरड कोसळल्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सध्या कास पठारावर फुले उमलली नसली तरी दर शनिवारी-रविवारी सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पुण्या-मुंबईचे शेकडो पर्यटक धाव घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कास पठार परिसरातील ओढे, नाले लाल मातीच्या रंगाने फेसाळू लागले आहेत. अनेक धबधबेही कोसळण्यास सुरुवात झाली आहे. हा पाऊस भात लागणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भात शेतीच्या शिवारात पाणी साचल्यामुळे डोंगरावरील शेतकऱ्यांची आता लगबग सुरू झाली आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाऊस जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा : सातारा १३.७, जावळी ४२.८, पाटण २१, कऱ्हाड ७.२, कोरेगाव ४.१, खटाव ०.७, माण ०.१, फलटण ०.७, खंडाळा ११.४, महाबळेश्वर १०३.१. पूर्वेकडे थंड वारे... पश्चिम भागात पाऊस पडत असला तरी पूर्व भागात मात्र पावसाचे दर्शन नाही. सध्या माण, खटाव तालुक्यांत थडगार वारे वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
कोयनेच्या पाण्यात वाढ; यवतेश्वर घाटात दरड
By admin | Updated: July 3, 2016 00:11 IST