सातारा: शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातील पोलीस चौकी गुन्हेगारीमुक्त केल्याची बातमी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी ही ‘लोकमत’ची बातमी ट्विट करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हा सातारा पोलिसांचा पॅटर्न राज्यभर राबवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
सातारा बसस्थानकातील गुन्हेगारी शून्यावर आणण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या व्यूहरचना वाखाण्याजोग्या होत्या. खबऱ्यांचे नेटवर्क म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मित्र आणि हॉकर्सना कान, नाक, डोळे बनवलं. त्यामुळे बसस्थानक गुन्हेगारीमुक्त झालं. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ७ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झालं. त्यानंतर ही ‘लोकमत’ची बातमी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी ही बातमी वाचून रि ट्विट करत सातारा पोलीस दलातील अधिकारी अण्णासाहेब मांजरे आणि त्यांच्या टीमचे त्यांनी कौतुक केले. तसेच राज्यभरातील पोलिसांनी अशाप्रकारे काम करून सातारी पॅटर्न राबवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलेली ‘लोकमत’ची बातमी सोशल मीडियावर आणि पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही व्हायरलं झाली. अशा प्रकारे खुद्द गृहमंत्र्यांनीच कौतुक केल्याने सर्वच पोलीस कर्मचारी अक्षरश: भारावून गेले. आपण केलेल्या प्रामाणिक कामाची ‘लोकमत’ने दखल घेतल्याने अनेक अधिकाऱ्यांनी ही बातमी व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवली होती.