महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी या मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन तसेच वृक्षतोड करण्यात येत आहे. मात्र, नगरपालिका व तहसीलदार कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. महाबळेश्वरसारख्या संवेदनशील ठिकाणी सुरू असलेले हे प्रकार गंभीर असून, प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यालगत जागा मिळणे मुश्किल झाले आहे. यदाकदाचित जागा मिळाल्यास बांधकाम करण्यासाठी परवागी मिळणे अश्यकच आहे. मात्र, जागा घेणारा धनिक गावातील किंवा महाबळेश्वर शहरातील एखाद्या दलालास हाताशी धरून चिरीमिरी देऊन हे काम करीत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.महाबळेश्वरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेटगुताड या गावात सर्व्हे नबंर १४/८ ब हरेष दिलीपकुमार परियाणी या धनिकाने गेल्या दोन दिवसापासून बेकायदेशीररीत्या जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने पाच गुंठे जागेत उत्खनन सुरू केले आहे. काही स्थानिक नागरिकांनी उत्खन्नाची माहिती तलाठी कार्यालयात दिली; परंतु याबाबत पंचनामा करण्यास कोणताही अधिकारी संबंधित ठिकाणी फिरकला नाही. प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)कारवाईची मागणी--महाबळेश्वर शहरात वेण्णा लेक परिसारतही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. या ठिकाणी एका धनिकाने पालिकेस केराची टोपली दाखवली आहे. तसेच तीन मजली इमारत उभी केली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी असून, प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महाबळेश्वरात बेकायदा उत्खनन, वृक्षतोड
By admin | Updated: December 7, 2015 00:27 IST