मलकापूर : मार्केट यार्ड ते नांदलापूर रस्त्याचे रूंदीकरण बाधित शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई न देता बेकायदेशीरपणे सुरू आहे़ अशा बेकायदा कामावर बाधितांची तीव्र हरकत असल्याची तक्रार नागरिकांनी मुख्य अभियंत्यांसह बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे़ आक्षेप घेऊनही जर बेकायदा भूसंपादन कराल तर दिवाणी व फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे़ मार्केट यार्ड ते नांदलापूर रस्त्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १२ कोटी ४० लाखांचा निधी दिला आहे़ कामाचा नमुना म्हणून १०० मीटरच्या रस्त्याचे रूंदीकरणाचे कामही संथ गतीने सुरु आहे़ त्यातच या रूंदीकरणाला काही नागरिकांचा विरोध आहे़ रूंदीकरणासाठी भूसंपादनाच्या यादीत असलेल्या नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही़ त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा बाधित शेतकऱ्यांनी न्यायालयासह मुख्य अभियंता व बांधकाम मंत्र्यांकडे धाव घेतली आहे़ संबंधित रस्त्याचे रूंदीकरण बेकायदेशीर असल्याचा लेखी दावा नागरिकांनी केला आहे़ याशिवाय कायदेशीर नुकसान भरपाई न देता हे काम असेच सुरू ठेवल्यास संबंधितांवर दिवाणी व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे़ या रूंदीकरणाविरोधात मलकापूरचे माजी सरपंच संजय जिरंगे यांच्यासह ३३ शेतकऱ्यांनी बांधकाम मंत्र्यांकडे दाद मागितली आह़े़ (प्रतिनिधी)
भूसंपादन कराल तर फौजदारी करू
By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST