वरकुटे-मलवडी : दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
वरकुटे-मलवडी येथील मारुती मंदिरात आयोजित बैठकीला सरपंच बाळकृष्ण जगताप, अंकुश गाढवे, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय सोनवणे, माजी सरपंच जालिंदर खरात, भारत अनुसे, विजयकुमार जगताप, बापूराव बनगर, सचिन होनमाने, सुनील थोरात उपस्थित होते.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, शेणवडी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासकीय पातळीवर पंचनामेही करण्यात आले. मात्र, अद्याप कोणत्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमाही मिळालेला नाही. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता पन्नास हजार रुपये शासनाने जाहीर केला असताना एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. मार्च महिन्याच्या अखेरीस सोसायटीच्या नियमानुसार कर्ज नियमित करावयाचे असल्याने काय करावे? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यावर शासनाने ताबडतोब निर्णय न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.