सातारा : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक करणारे मेढा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांची ‘पोलीस महासंचालक शौर्य पदक’साठी शिफारस करणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिली.
कुख्यात गुंड गजा मारणे याला व त्याच्या साथीदारांना आठवडाभरापूर्वी मेढा पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले होते. गजा मारणे हा पुण्याहून महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी केवळ एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन गजा मारणेच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर माने यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने थंड डोक्याने गजा मारणे याला गजाआड केले. जे पुणे पोलिसांना जमले नाही ती धाडसी कामगिरी केवळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी पोलीस मुख्यालयात जाऊन मेढा पोलीस ठाण्यातील कारवाईत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी गजा मारणेला नेमके कसे पकडले, याचा थरार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या समोर कथन केला. हा थरार ऐकून गृहराज्यमंत्री देसाई यांनी माने यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारुन त्यांची पोलीस महासंचालक शौर्य पदकासाठी शिफारस करणार असल्याचे आवर्जून सांगितले. खुद्द गृहराज्यमंत्र्यांनी कामाची दखल घेतल्याने अन्य पोलीस कर्मचारीही भारावून गेले होते.