कऱ्हाड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी कऱ्हाडसह परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेले पंधरा दिवस कऱ्हाडमध्ये जयंतीचे औचित्य साधून छोटे-मोठे कार्यक्रम सुरू आहेत. बुधवारी जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातून १२५ मशालींची मिरवणूक काढण्यात आली. तर गुरुवारी सकाळी युवकांच्या वतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तर उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भीमप्रेमी सहभागी झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकवर्षी साजरी होतेच; पण या वर्षीच्या जयंती सोहळ्याला १२५ वर्षे पूर्ण झाल्याने अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरात सर्वसमावेशक जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आणि गेले दहा दिवस व्याख्याने, शिबिरे, स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम त्यामार्फत सुरू होते. नगरपालिकेजवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागे भव्य आरास करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने झगमगत आहे.दरम्यान, बुधवारी रात्री उत्सव समितीच्या वतीने १२५ मशाली घेऊन शहरातून मशाल मिरवणूक काढण्यात आली. यात सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, अल्ताफ शिकलगार, संयोजन समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ थोरवडे, उपाध्यक्ष किशोर आठवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मशाल मिरवणूक काढून डॉ. बाबासाहेब यांच्या आठवणींना जणू उजाळा देण्याचाच प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सिद्धार्थ थोरवडे, अभिजित थोरवडे, राहुल थोरवडे, किशोर आठवले, विजय काटरे, किरण थोरवडेसह शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. दत्तचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही त्यांनी अभिवादन केले. यावेळी ‘जयभीम’ आणि ‘जय शिवराय’ या घोषणानीही परिसर दुमदुमून गेला.सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. झांजपथक, बँडपथक, लेझीमपथक आदी वाद्यांच्या गजरात निघालेल्या हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब यांनी समाजाला शांतीचा संदेश दिला त्याला अनुसरून मिरवणुकीत सहभागी चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले पुतळा, बापूजी साळुंखे पुतळा, एसटी स्टँड, दत्तचौक, मुख्य बाजारपेठ, चावडीचौक, कन्याशाळा, जोतिबा मंदिरापासून आंबेडकर चौकात येऊन पूर्ण केली. (प्रतिनिधी)
हजारो भीमप्रेमींच्या गर्दीने कऱ्हाडचे रस्ते फुलले !
By admin | Updated: April 14, 2016 23:01 IST