वाठार स्टेशन : सोळशी, ता. कोरेगाव येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेल्या तीन पिढ्यांपासून प्रलंबित होता. स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचे दीड किलोमीटर अंतर ३५ शेतकऱ्यांच्या बांधावरील पायवाटेने चालत जावे लागत होते. सर्वांनाच या रस्त्याची गरज असतानाही यासाठी पुढाकार कोणी घेत नव्हते. शेवटी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या रस्ताचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे सुमारे शंभर वर्षांनी स्मशानभूमीच्या रस्त्याचा तिढा आता कायमस्वरूपी सुटला आहे.कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर सोळशी हे गाव आहे. या गावास धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. सोळा शिवलिंग असलेल्या या गावातील हरेश्वर डोंगरतूनच वसना नदीचा उगम होतो. त्याच्याच शेजारी आता शनैश्वर या देवस्थानला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या गावाबाहेर स्मशानभूमी आहे. तिकडे जाण्यासाठी हक्काचा रस्ता नव्हता. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांची नेहमीच तारांबळ होत होती. अखेर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक झाली. लोकांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून १५ फूट रुंद, दीड किलोमीटर लांब रस्ता मुरुम व खडीकरणातून पूर्ण करण्यात आला. यामुळे आता गावाचा गेल्या शंभर वर्षांचा स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (वार्ताहर)
शंभर वर्षांनंतर स्मशानभूमीला रस्ता !
By admin | Updated: April 18, 2015 00:09 IST