वाठार स्टेशन : दिल्लीकरांच्या जिभेचा हट्ट पुरवणारा कोरेगावचा राजमा (वाघा घेवडा) यंदा प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आला आहे. कोरेगाव तालुक्यातील हे पीक सध्या काढणीत आले आहे. सध्या या घेवड्याला चांगला दर मिळत आहे. मात्र, यंदा हा घेवडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेवडा खरेदी करताना आर्द्रता मापकातून तपासूनच दर देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना हा घेवडा चांगला वाळवून घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कोरेगाव, खटाव तालुक्यांमध्ये खरीप हंगामात उत्पादित होणारा वाघा घेवडा अनेक वर्षांपासून अडचणीत आला आहे. या पिकाला पीक विम्यात स्थान नसण्याबरोबरच त्याला हमीभाव नसल्याने घेवडा उत्पादक शेतकरी आता सोयाबीनकडे वळला आहे. संपूर्णपणे हवामानावर अवलंबून असलेल्या या पिकाला जास्त पाऊस आणि कडक ऊन दोन्ही गोष्टी सहन होत नसल्याने घेवडा हे पीक कोरेगाव व खटाव तालुक्यांत घेतलं जातं. येथे उत्पादित झालेला घेवडा हा दिल्लीमध्ये राजमा हा खाद्यपदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. कोरेगाव तालुक्यातील देऊरमधील तुळजाभवानी शेतकरी बचत गटाच्या प्रयत्नाने या घेवड्याला काही वर्षांपूर्वी जागतिक मानांकन मिळाले. तर काही दिवसांपूर्वी पोस्ट खात्याने या पिकाची दखल घेऊन त्याचे एक पोस्टकार्ड प्रकाशित करून त्याचा सन्मान केला. मात्र, या बचत गटाला अर्थ पुरवठा देण्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी पावसाच्या अवेळीपणामुळे घेवड्याचे उत्पादन कमी झाले आहे. असे असले तरी घेवडा खरेदी करणारे व्यापारी मात्र आपल्या मर्जीप्रमाणे याची खरेदी करून दर पाडत आहेत. यासाठी सरकारने घेवडा पिकाला निश्चित हमीभाव देणे गरजेचे आहे.
०६ कोरेगाव घेवडा
देऊर परिसरात व्यापारी आर्द्रता मीटरद्वारे घेवडा वाळलेला असल्याची तपासणी करत आहेत.